भंडारा - पोहरा ग्रामपंचायतीतून मेंढा आणि गडपेंढरी ग्राम पंचायत वेगळ्या करण्याच्या मागणीला घेवून लाखनी तालुक्यातील दोन गावातील नागरीकांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहीष्कार घातला आहे. या दोन गावातील एकही उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने येथील निवडणूक रद्द करण्यात आली आहे.
ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया 2002 पासून सुरू आहे लढा -
लाखनी तालुक्यातील पोहरा या गावाला मेंढा आणि गडपेंढरी या दोन गावांची गट ग्रामपंचायत जोडली गेली आहे. मेंढा आणि गडपेंढरी या दोन गावांची मिळून एक स्वतंत्र ग्रामपंचायत असावी, या मागणीसाठी या दोन्ही गावातील गावकरी 2002 पासून संघर्ष सुरू केले आहे. 2002 ला यांनी पहिला प्रस्ताव पाठविला होता. मात्र, त्यावर कुठलाही निर्णय झाला नाही. 2017 ला त्यांनी दुसऱ्यांदा पुन्हा प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, हा प्रस्तावही धूळखात असल्याचे गावकऱ्यांनी म्हटले आहे.
नाना पटोले यांचेही दुर्लक्ष -
हे दोन्ही गाव विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या क्षेत्रातल्या आहेत. मात्र, असे असले तरी या दोन्ही गावांच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावकरी करीत आहेत. या प्रस्तावा विषयी नाना पटोले यांना सांगितले मात्र त्यांनी दुर्लक्ष केले आहे. गट ग्रामपंचायत असल्यामुळे या गावाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या गावाच्या विकासाचे कामे रस्ते नाल्या किंवा इतर गोष्टींकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आम्हाला आमची ग्रामपंचायत वेगळी हवी आहे अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.
कोणीही उमेदवारी अर्जच भरला नाही -
मेंढा आणि गडपेंढरी या दोन्ही गावातील नागरिकांनी या ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार घालत एकही उमेदवार उभा केला नाही. त्यामुळे आज या दोन्ही गावांमधील लोकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत आमच्या या दोन्ही गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत होणार नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत निवडणूकवर बहिष्कार घालण्याचे गावकऱ्यांनी ठरविले आहे.
हेही वाचा - कोल्हापूर : झेडपीच्या सर्वांत मोठ्या डिजिटल शाळेचे उद्या शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण