भंडारा- जिल्ह्यात धान खरेदी केंद्रांचा शुभारंभ झाला. मात्र, ऑनलाइन सातबारा अद्यावत न झाल्याने धान खरेदी बंदच असल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला आहे. तलाठी कार्यालयाने सातबारा अद्यावत न केल्याने त्याचा मनस्ताप आता शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
माहिती देताना शेतकरी आणि जिल्हाधिकारी जिल्ह्यात यावर्षी १ लाख ९० हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली. विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देऊन शेतकऱ्यांनी त्यांचे धान पिकवले. धानाचा मोबदला शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवर योग्य प्रमाणात मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी त्यांचे धान केंद्रांपर्यंत नेले. मात्र, ऑनलाइन साताबारा अद्यावत न झाल्याने शेतकऱ्यांची धान विक्री खोळंबली आहे.
शेतकऱ्यांनी तलाठ्याकडून सातबारा घेऊन तो धानखरेदी केंद्रांवर दिला. मात्र, सातबारा ऑनलाइनरित्या अद्यावत नसल्याने खरेदी केंद्रांकडून तो नाकारण्यात आला आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांनी आणलेला धान आता खरेदी केंद्रांबाहेर पडला आहे. शेतकरी तलाठी कार्यालयात चकरा मारत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे, शासनाने धान खरेदी केंद्रे सुरू असल्याची घोषणा केली असली, तरी एक किलोही धानाची खरेदी अद्याप झाली नसल्याचे चित्र आहे.
७० टक्के ७/१२ ऑनलाइन
शेतकऱ्याचा ७/१२ ऑनलाइन अद्यावत करणे ही शासकीय यंत्रणेची जबाबदारी आहे. ही जबाबदारी अजून ७० टक्केच पूर्ण झालेली आहे. अजूनही ३० टक्के शेतकऱ्यांचा सातबारा ऑनलाइन अद्यावत झालेला नाही. असे असताना ऑनलाइन सातबाराची अट घालून शेतकऱ्यांची कोंडी करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
ऑनलाइन सातबाराच्या माध्यमातून धान खरेदीमध्ये होणारा घोटाळा टाळता येऊ शकतो. म्हणून शासनाने यावर्षीपासून ही अट लागू केली. मात्र, ही अट लागू करताना शासनाने १०० टक्के शेतकऱ्यांचा सातबारा ऑनलाइन केला असता, तर ही अडचण आली नसती. ज्या शेतकऱ्यांनी त्यांचा धान खरेदी केंद्रावर नेला त्यांना त्यांची दिवाळी आनंदात जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, शासनाच्या धोरणामुळे या वर्षीही शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच जाईल अशी परिस्थिती आहे.
दरम्यान, ३० टक्के शेतकऱ्यांचा सातबारा ऑनलाइन अद्यावत झाला नसला, तरी ७० टक्के शेतकऱ्यांचा सातबारा अद्यावत झाल्याने धान खरेदीची प्रक्रिया सुरू करता येईल, आणि ती लवकर सुरू होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा-बचत गटाच्या महिलांना मिळाले हक्काचे विक्री केंद्र, खऱ्या अर्थाने होत आहेत स्वावलंबी