भंडारा - जिल्ह्यात सुरू असलेल्या दुग्ध भूकटी प्रकल्पाला दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच एका आठवड्यामध्ये रक्कम मिळणार आहे. तसे आदेश दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी अधिकाऱ्यांंना दिले आहेत.
कोरोना संकटकाळातील लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भंडारा जिल्हयातील बंद असलेला दुधभुकटी प्रकल्प सुरू केला आहे. मात्र, या प्रकल्पासाठी दूध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर मिळत नसल्याच्या तशीच बऱ्याच शेतकऱ्यांची जुनी थकबाकी असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे थकबाकी रक्कम तातडीने अदा करण्यात यावी. या संदर्भात एक आठवडयापेक्षा जास्त दिवस रक्कम थकीत राहता कामा नये, यादृष्टीने सर्व स्तरावर अत्यंतिक दक्षता घेण्यात यावी, असे स्पष्ट आदेश पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री आणि पालकमंत्री सुनिल केदार यांनी संबंधितांना दिले.
आज (मंगळवारी) विधान भवन, मुंबई येथे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली दूध भुकटी प्रकल्पासंदर्भात उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी केदार यांनी व्यवस्थापकीय संचालक महानंदसह सर्व संबंधितांना अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दुधाची रक्कम तातडीने मिळण्यासंदर्भात सर्व आवश्यक उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना दिल्या.