भंडारा : मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पाऊस येईल असे वाटत असताना वरुणराजा सतत हुलकावणी देत होता. अखेर, शनिवारी सायंकाळी वातावरणात मोठा बदल झाला आणि काही तासांच्या अवधीत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांनी मिळेल तिथे आसरा घेतला. हा मान्सूनचा पाऊस नसला तरी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दिवसभराच्या गरमीपासून सुटका झाल्याने सर्वसामान्य नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. साधारण पाऊण तास पाऊस पडत होता.