भंडारा - शहरात गुरुवारी 'गणपती आणि 'सिद्धी-बुद्धी' यांचा लग्नसोहळा पहिल्यांदाच विदर्भात पार पडला. खरतर असे म्हटले जाते की देव स्वर्गात लग्नाच्या गाठी बांधतो पण, भंडाराकरांनी चक्क देवांचेच लग्न लावले आहे. या अनोख्या लग्न सोहळ्याच्या वेळी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती.
भंडारा शहरातील श्री सिद्ध चिंतामणी मंदिरात मागील ३ दिवसांपासून या लग्न सोहळ्याचे सर्व सोपस्कार पार पाडले जात आहे. यानुसार पहिल्या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दुसऱ्या दिवशी सीमांत पूजेचे आयोजन केले गेले तर, तिसऱ्या दिवशी गुरुवारी गणपती आणि सिद्धी-बुद्धीच्या लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
शहरातली काकडे निखाडे दांपत्याने सिद्धी-बुद्धीचे तर, रामेकर दांपत्याने गणपती बाप्पाचे कंकण धरले होते. या दोन्ही घरी मांडव घालण्यात आला होता. २९ रोजी वधू-वराच्या घरी हळदीचा सोहळा पार पडला. परमेश्वराचा सीमांत पूजनाचा विधी सर्वांसाठी एक आगळीवेगळी पर्वणी होती. यानंतर ३० जानेवारीला सकाळी बहिरंगश्वर मंदिर परिसरातून चिंतामणी मंदिराच्या दिशेने वरात निघाली. घोडे, मंगलवाद्य आणि बँड आणि वरात नाचत-गात मांडवात पोहोचली आणि बाप्पांची मंगलाष्टकांसही लग्नगाठ बांधली गेली, यावेळी उपस्थितांनी फुलांची उधळून केली.