भंडारा - शासनाच्या योजनेअंतर्गत मानधन मिळवून देण्याच्या नावावर वृद्ध लोककलाकारांकडून लाच घेणाऱ्या समाजकल्याण विभागातील लिपिकाला अटक करण्यात आली आहे. भंडारा लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली. अभय मोतीराम पशिने वय (53), असे लाचखोर लिपिकाचे नाव आहे.
शासकीय मानधन मिळवून देण्याच्या नावावर लोककलाकारांकडून लाच घेणाऱ्या लिपिकाला अटक
भंडाऱ्याच्या समाजकल्याण विभागातील लिपिकाला लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अभय मोतीराम पशिने, असे या लाचखोर लिपिकाचे नाव असून त्याने शासनाच्या योजनेअंतर्गत मानधन मिळवून देण्याच्या नावावर वृद्ध लोककलाकारांकडून 5 हजार रुपयांची लाच घेतल्याची माहीती आहे.
हेही वाचा - कडकनाथ कोंबडी घोटाळा : शेतकऱ्यांचे आझाद मैदानात आंदोलन, आरोपींची संपत्ती विकून नुकसान भरपाईची मागणी
मोहाडी तालुक्यातील हरदोली गावात राहणारे वृद्ध कलाकार एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षकाचे काम करतात. गेल्या ४० वर्षांपासून हार्मोनियम वादक, भजनकार, गायक, नाटक कलाकार म्हणून स्थानिक पातळीवर ते काम करीत होते. लोक कलाकारांना शासनातर्फे मानधन मिळते, अशी माहिती त्यांना मिळाली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांनी फेब्रुवारीमध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अर्ज केला. दरम्यान, 1 मार्चला कला तपासणी कार्यक्रमासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह सामाजिक न्याय भवनात त्यांनी मुलाखती दिली. यानंतर समाजकल्याण विभागातील लिपिक अभय पशिनेनी त्यांना भेटून निवड प्रकियेसाठी मुलाखत घेणाऱ्या कमिटीकडून मार्क वाढवून निवड करून देतो, असे सांगितले. यासाठी ५ हजार रुपयांचा खर्च येईल, असेही सांगितले. याबद्दल त्यांनी भंडारा लाचलुचपत विभागाला तक्रार केली असता शुक्रवारी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय भंडारा येथे सापळा रचून अभय पशिने याला ५ हजार रुपये घेताना रंगेहाथ अटक केली.