भंडारा - भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त, आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत "माझी वसुंधरा" अभियानाच्या (Vasundhara Abhiyan) माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपालिका प्रशासनाच्या संयुक्त समन्वयाने मंगळवारी सकाळी रेल्वे ग्राऊंड खात रोड भंडारा येथे भव्य सायकल परेडचे (Bicycle Parade in Bhandara) आयोजन करण्यात आले होते. भंडारा जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात सायकल परेडचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल परेडमध्ये 2450 लोकांनी सहभाग घेतला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सायकल परेडला सुरुवात करण्यात आली, तर भंडारा विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर आणि भंडारा गोंदिया विधान परिषदेचे आमदार परिणय फुके यांनी स्वतः सायकल चालवत या परेडमध्ये सहभाग घेतला. या आगळ्यावेगळ्या सायकल परेडचा लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्याचे आयोजकांचा प्रयत्न आहे.
रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात - निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्याच्या या अनोखा प्रयत्नांत सकाळी सहा वाजेपासून रेल्वे ग्राउंडवर विद्यार्थी आणि इतर सायकलपटू एकत्रित आले होते. सायकलपटूच्या मार्गांमध्ये कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होत. उपस्थित सायकलस्वार यांनी भारतीय ध्वज, रंगवली टोप्या परिधान करून विशाल मानवी शृंखला यांच्या माध्यमातून तिरंगा साकार केला.
वसुंधरेची निघा राखण्याची शपथ - सकाळी साडेसातच्या दरम्यान सुरुवातीला जिल्हाधिकारी यांनी उपस्थित सर्वांना वसुंधरेची निघा राखण्याची शपथ दिली. त्यानंतर राष्ट्रगीत पार पडले आणि त्यानंतर तिरंगा च्या रंगातील फुले आकाशात सोडण्यात आली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हिरवी झेंडी दाखवून सायकल परेडला सुरूवात केली. तर आमदार नरेंद्र भोंडेकर आणि आमदार परिणय फुके यांनी स्वतः सायकल चालवत हे सात किलोमीटरचे अंतर पार पाडून या योजनांमध्ये सहभाग नोंदविला.