बीड- एकीकडे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार 33 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करत आहेत, तर दुसरीकडे बीड जिल्ह्यात वनविभागाच्या आशीर्वादाने सर्रास वृक्षतोड सुरू आहे. याकडे बीडच्या वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी बीड जिल्ह्यातील वृक्षतोडीकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी पर्यावरण प्रेमी सुधाकर देशमुख यांनी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने केली आहे.
बीड जिल्ह्यातील पिंपळनेर, चौसाळा, पाटोदा आदी भागात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. बीड तालुक्यातील पिंपळनेर भागातून दिवसाढवळ्या वृक्षतोड करून ओली लाकडे वाहून नेली जातात. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. मोसमी पाऊस काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पाऊस पडताच जून-जुलै महिन्यात 33 कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्याच्या वनविभागाने हाती घेतला आहे. असे असतानादेखील बीड जिल्ह्यात वनविभागाच्या आशीर्वादाने सर्रास वृक्षतोड सुरू आहे. या सर्व बाबींचा फटका पर्यावरणाला बसत आहे.