आष्टी (बीड) - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संपूर्ण राज्यभर लाॅकडाऊन सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मलाला विक्रीसाठी अडचणी येत आहेत. यासाठी आयसीआयसीआय फाउंडेशन व युवक मंगल शेतकरी उत्पादक संघ (लोणी सय्यदमीर) यांनी शेतकऱ्यांचा भाजीपाला गावातच खरेदी करून शेतकऱ्यांना एक नवीन मार्केट उपलब्ध करून दिलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल गावातच विक्री होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
आष्टी तालुक्यातील आनंदवाडी/सराटेवडंगाव येथे उभारण्यात आलेल्या भाजीपाला संकलन केंद्राचे उद्घाटने आयसीआयसीआय फाउंडेशनचे प्रकल्प अधिकारी चेतन पाटोळे व युवक मंगल ॲग्रोटेकचे अधिकारी हनुमंत पोकळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयसीआयसीआय फाऊंडेशनचे समन्वयक यशवंत बहिरम, महेश खांदवे (लोणी), सराटे वडगाव, आनंदवाडीचे सरपंच प्रा. राम बोडके उपस्थित होते. भाजीपाला खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना सकाळी भाजीपाल्याचा भाव कळविला जातो. त्यानंतर संध्याकाळी भाजीपाला खरेदी केला जातो. हा सर्व व्यवहार रोख असल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांना गावामध्येच मार्केट उपलब्ध झाल्याने बाहेरगावी जाण्याचा त्रास सहन करावा लागत नाही. तसेच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य भाव मिळणार असल्याचा विश्वास सरपंच प्रा. राम बोडखे यांनी व्यक्त केला.