महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काळरात्र.. बापाच्या कुशीत झोपलेल्या चिमुकल्याचे जाग येण्यापूर्वीच हरवलं 'पितृछत्र'

एक बाप आपल्या तीन ते चार वर्षांच्या चिमुकल्याला सोबत घेऊन परळीच्या बसस्थानकात आला. रात्र झाली म्हणून बसस्थानकातच प्लॅटफॉर्मवर चिमुकल्याला छातीशी कवटाळून झोपला. पण बापाच्या कुशीत बिलगून झोपलेल्या चिमुकल्याचे जाग येण्यापूर्वीच 'पितृछत्र' हरवल्याची ह्रदयद्रावक घटना परळीच्या बसस्थानकात २१ मार्च रोजी रात्री घडली. या चिमुकल्या मुलासाठी मात्र ही काळरात्र ठरल्याची चर्चा व हळहळ नागरिक व्यक्त करत आहेत.

sudden death of a person at Parli Vaijnath bus stand
sudden death of a person at Parli Vaijnath bus stand

By

Published : Mar 23, 2021, 5:30 PM IST

परळी वैजनाथ (बीड) -एक बाप आपल्या तीन ते चार वर्षांच्या चिमुकल्याला सोबत घेऊन परळीच्या बसस्थानकात आला. रात्र झाली म्हणून बसस्थानकातच प्लॅटफॉर्मवर चिमुकल्याला छातीशी कवटाळून झोपला. पण बापाच्या कुशीत बिलगून झोपलेल्या चिमुकल्याचे जाग येण्यापूर्वीच 'पितृछत्र' हरवल्याची ह्रदयद्रावक घटना परळीच्या बसस्थानकात २१ मार्च रोजी रात्री घडली. याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शेख शाहेद शेख उस्मान (रा.बरकतनगर परळी वैजनाथ) बाहेरगावाहून २१ मार्च रोजी रात्री परळीच्या बसस्थानकात उतरले. त्याच ठिकाणी प्लॅटफॉर्मवर अंथरुन टाकून आपल्या तीन ते चार वर्षांच्या मुलाला घेऊन तो व्यक्ती झोपी गेला. २२ मार्च रोजी सकाळी नागरिकांनी प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या या व्यक्तीला व मुलाला बघितले. दिवस उजाडून बराच वेळ झालेला असतानाही हे झोपेतून उठले नाहीत. हे पाहून नागरिकांनी जवळ जाऊन बघितले असता झोपलेल्या व्यक्तीच्या हालचाली बंद असल्याचे निदर्शनास आले.

नागरिकांनी ही बाब पोलिसांना कळवली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर हा व्यक्ती मृत झाल्याचे लक्षात आले. पोलिसांनी मृताची ओळख पटवण्याच्या दृष्टीने शोध घेतला असता मृताचे नाव शेख शाहेद शेख उस्मान (रा. बरकतनगर, परळी वैजनाथ) असा पत्ता लागला. याप्रकरणी उत्तरीय तपासणी नंतर संभाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हे ही वाचा - बनावट आधार कार्डवर महागड्या ट्रायडेंटमध्ये राहात होते वाझे, एनआयएचा गौप्यस्फोट
दरम्यान आपल्या बापाच्या कुशीत निर्धास्तपणे बिलगून झोपलेल्या चिमुकल्याचे जाग येण्यापूर्वीच 'पितृछत्र' हरवलं. या चिमुकल्या मुलासाठी मात्र ही काळरात्र ठरल्याची चर्चा व हळहळ नागरिक व्यक्त करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details