बीड- झोपेत असलेल्या एका व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामधील देवीनिमगाव येथे गुरुवारी घडली. खुनाचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. ईश्वर दत्तु नवसुपे (रा. मंगरूळ ता. आष्टी वय-27 ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. कांतीलाल मारूती काकडे ( रा. निमगाव) असे आरोपीचे नाव असून कांतीलाल हा व्यवसायाने मजूर आहे. ईश्वर नवसुपे हे गवंडी आहेत.
बांधकाम ठिकाणीच मजुराने घातला दगड-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ईश्वर नवसुपे हे गाढ झोपेत असताना गुरुवारी सकाळीच आरोपीने त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला. आष्टी तालुक्यातील देविनिमगांव येथील वाळके अनारसे वस्तीवर गोरख नारायण पाचारणे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. हे काम मंगरूळ येथील गवंडी ईश्वर दत्तु नवसुपे आणि बांधकाम मजूर कांतीलाल मारूती काकडे करत आहेत. दोघेही बुधवारी काम आटोपून बांधकामाच्या ठिकाणीच झोपले होते. मात्र, गुरूवारी पहाटे साडेसहाच्या दरम्यान मजूर कांतीलाल याने गाढ झोपेतील ईश्वर नवसुपे यांच्या डोक्यात दगड घातला. यात ते गंभीर जखमी झाले. यानंतर त्या मजुराने घराच्या मालकाच्या चारचाकी कारवरही (MH.02,DJ.2574 ) दगडफेक केली.
उपचारापूर्वीच मृत्यू-
या घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, पोलीस उपनिरीक्षक राहुल लोंखडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी कांतीलाल याला ताब्यात घेत गंभीर जखमी ईश्वर यास लागलीच अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डाॅक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात गोरख नारायण पाचारणे यांच्या तक्रारी वरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाचे कारण अद्यापही समजू शकले नाही. खून कशासाठी केला याचा तपास पोलीस करत आहेत.