महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीड जिल्ह्यात तुरळक पाऊस; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

बीड जिल्ह्यातील नेकनूर, मांजरसुंबा, चौसाळा, रायमोह, यासह बीड शहर परिसरात बुधवारी सायंकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, बीड जिल्ह्यात पडलेला पाऊस नैसर्गिक आहे की, कृत्रिम याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर झाली.

बीड जिल्ह्यात तुरळक पाऊस; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

By

Published : Aug 21, 2019, 9:31 PM IST


बीड - दुष्काळाने त्रस्त जिल्ह्यात पावसाचे बुधवारी सायंकाळी आगमन झाले. बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

बीड जिल्ह्यात तुरळक पाऊस; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
जिल्ह्यातील नेकनूर, मांजरसुंबा, चौसाळा, रायमोह, यासह बीड शहर परिसरात बुधवारी सायंकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. पावसाळ्याचे दोन महिने संपले तरी पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंताक्रांत होता. शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, कापूस, उडीद व तुर ही पिक सुकून गेली आहेत. पिकांनी माना टाकल्याचे चित्र मागील आठवड्यापासून पाहायला मिळत होते. जुलै व ऑगस्टचा अर्धा महिना कोरडा गेल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
बीड शहराला पंधरा दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जातो. तर ग्रामीण भागांमध्ये भर पावसाळ्यात देखील पाण्याचे टँकर सुरू आहेत. अशा बिकट परिस्थितीत अचानक गायब झालेला पाऊस पुन्हा कोसळत असल्याने सर्वत्र आनंदी वातावरण निर्माण झाले. दरम्यान, बीड जिल्ह्यात पडलेला पाऊस नैसर्गिक आहे की, कृत्रिम याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर झाली. परतीचा पाऊस मराठवाड्यात पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बीड जिल्ह्यात 144 सिंचन प्रकल्प आहेत यापैकी 103 सिंचन प्रकल्प कोरडे पडले आहेत. परतीच्या पावसावरच बीड जिल्हा अवलंबून असल्याने परतीच्या पावसाकडे नागरिकांचे डोळे लागले आहेत.


कृत्रिम पावसाची सोशल मीडियावर चर्चा-


मराठवाड्यावर कृत्रिम पाऊस पडणार आहे. ज्या जिल्ह्यात ढग दिसतील त्या जिल्ह्यातील नागरिकांनी तत्काळ प्रयोगशाळेला फोन करून कळवावे, अशी अफवा मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत होती. या अफवेबाबत बीड जिल्हाधिकारी कार्यालयाने बुधवारी सायंकाळी स्पष्टीकरण देखील दिले आहे.

सोशल मीडियावर फिरत असलेला कृत्रिम पावसाचा मेसेज अफवा असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. तरी देखील बुधवारी सायंकाळी बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या नंतर हा पाऊस नैसर्गिक की, कृत्रिम अशी चर्चा सोशल मीडियावर होती. मात्र, पाऊस नैसर्गिक असल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details