बीड - लोकसभा निवडणुकीत जिल्ह्याच्या मतदारांनी लेकीची ओटी मतदानरुपी आशीर्वादांनी भरली, अशा शब्दात प्रितम मुंडे यांनी मतदारांचे आभार मानले. मतदारांच्या या ऋणांची परतफेड करणे शक्य नाही. तरी जनतेचे ऋण येणाऱ्या काळात विकास कामांच्या माध्यमातून फेडण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही डाॅ. प्रितम मुंडे यांनी दिली. ते जिल्ह्यातील आभार दौऱ्यात बोलत होत्या.
लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर जिल्ह्यात आलेल्या खासदार डॉ.प्रितम मुंडे यांनी मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी 'आभार दौऱ्या'स सुरुवात केली. या दौऱ्यात त्यांनी बीड तालुक्यातील शिवणी , जरुड, बाभळखुंटा, मौज, ढेकणमोहा , बाबू नाईक तांडा ढेकणमोहा इत्यादी गावांना भेटी दिल्या.
मतदारांचे आभार मानताना प्रितम मुंडे म्हणाल्या, ज्या अपेक्षांनी जनतेने अभूतपूर्व मतदानरुपी विश्वास व्यक्त केला आहे, त्या अपेक्षांना सार्थ ठरविणार आहे. येणाऱ्या पाच वर्षात मतदारांच्या विश्वासाला साजेसे काम पालकमंत्री पंकजा यांच्या नेतृत्वात करणार आहे. जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
मागील साडेचार वर्षे जिल्ह्याची लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करत असताना रेल्वे,राष्ट्रीय महामार्ग, ग्रामीण रस्त्यांसह अनेक विकास कामे पूर्णत्वाला गेल्याचा त्यांनी दावा केला. पुढील पाच वर्षांच्या काळात जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी भरीव कार्य करायचे आहे. तसेच दुष्काळ आणि पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सिंचनाच्या विविध उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मुंडे यांनी यावेळी सांगितले.
जनतेशी असलेल्या नात्याला राजकारणाचा स्पर्श झाला नाही-
निवडणुकीदरम्यान विरोधकांकडून अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण करण्यात आले. परंतु बीड जिल्ह्याच्या स्वाभिमानी जनतेने मतदानाच्या माध्यमातून विकासाच्या राजकारणाला प्राधान्य दिले आहे. सामान्य जनतेशी लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांनी जोडलेल्या नात्याला राजकारणाचा स्पर्श झाला नाही. येणाऱ्या काळात जनतेशी असलेले नाते अधिक घट्ट करण्यासाठी मुंडे साहेबांच्या कार्याचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आशीर्वाद पाठीशी कायम ठेवा, असे आवाहन प्रितम मुंडे यांनी केले.
यावेळी भाजपचे नेता शिवाजीराव फड, सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याण आखाडे, शिवसेना जिल्हाप्रममुख सचिन मुळूक ,नवनाथ शिराळे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील गलधर, भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत फड ,अजय सवाई , अरुण डाके यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.