बीड -परतीच्या पावसामुळे बळीराजा संकटात आहे. अशा परिस्थितीत गाव स्तरावरचे राजकारण बाजूला ठेवून सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी जिल्हा प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन नवनिर्वाचित आमदार संदीप क्षीरसागर यांनी केले.
नवनिर्वाचित आमदार संदीप क्षीरसागर यांचे नागरिकांना आवाहन हेही वाचा - निफाडमध्ये गिरीश महाजनांच्या बैठकीत शेतकरी आक्रमक; द्राक्ष बागायतदारांना भरपाई देण्याची मागणी
बीड तहसील कार्यालयात रविवारी क्षीरसागर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेतला. गाव स्तरावर पंचनामा करताना येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासंदर्भात उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपविभागीय अधिकारी टिळेकर, माजी आमदार सय्यद सलीम, माजी आमदार सुनील धांडे, तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना क्षीरसागर म्हणाले, की शेतकऱ्यांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे प्रशासन स्तरावर केले जात आहेत. याशिवाय विमा कंपन्यांना देखील नुकसान भरपाई देण्याबाबत विभागीय आयुक्त यांनी सूचना दिलेल्या आहेत. आता गाव स्तरावरील राजकारण बाजूला सोडून सर्व कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बांधावर जाऊन जिल्हा प्रशासनाला पीक नुकसान पंचनामा करण्यासाठी मदत करावी. हेवेदावे बाजूला ठेवून नुकसान झालेल्या शेतकऱ्याला भरपाई कशी मिळेल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे सांगत उपस्थित महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना पंचनाम्या संदर्भात क्षीरसागर यांनी सूचना केल्या. यावेळी बीड तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य यांची देखील उपस्थिती होती.
हेही वाचा - 'महाराष्ट्राचे हित लक्षात घेता लवकरच सरकार स्थापन होईल'