बीड - हुतात्मा जवानांच्या पत्नींना जमीन देण्याचे शासनाचे धोरण आहे. यानुसार मागील दोन वर्षांपासून बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील हुतात्मा जवानांच्या पत्नी भाग्यश्री तुकाराम राख या जिल्हा प्रशासनाकडे हेलपाटे मारत आहेत. मात्र, त्यांचा जमीन मागणीचा प्रस्ताव लालफितीत पडला आहे. न्याय मिळत नसल्याने 15 ऑगस्टला आत्मदहन करणार असल्याचा इशारा भाग्यश्री राख यांनी दिला आहे. विशेष म्हणजे, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आठ महिन्यांपूर्वी माझा प्रस्तावावर तत्काळ निर्णय घेऊ, असे आश्वासन दिलेले असताना अद्यापपर्यंत मला न्याय मिळाला नाही, असे त्यांनी सांगितले.
हुतात्मा जवानांच्या वीरपत्नीने दिला आत्मदहनाचा इशार ; जमिनी मिळवण्यासाठी ससेहोलपट
हुतात्मा जवानांच्या पत्नींना जमीन देण्याचे शासनाचे धोरण आहे. यानुसार मागील दोन वर्षापासून बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील हुतात्मा जवानांच्या पत्नी भाग्यश्री तुकाराम राख या जिल्हा प्रशासनाकडे हेलपाटे मारत आहेत. न्याय मिळत नसल्याने 15 ऑगस्टला आत्मदहन करणार असल्याचा इशारा भाग्यश्री राख यांनी दिला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या 28 जून 2018 च्या शासन निर्णयान्वये हुतात्मा वारसांना शासनाकडून 2 हेक्टर जमीन देण्यात यावी, असा निर्णय आहे. माझे पती सैन्यात होते व एका दुर्घटनेत ते हुतात्मा झाले. या प्रकरणानंतर मी बीड जिल्ह्यातील आर्वी शिवारात मला पाच एकर जमीन मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव टाकलेला आहे. प्रस्ताव टाकून आता तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला, तरी देखील मला जमीन देण्याच्या प्रस्तावावर प्रशासन शिक्कामोर्तब करत नाही. माझा प्रस्ताव परिपूर्ण असतानादेखील महसूल विभागातील अधिकारी जाणीवपूर्वक मला हेलपाटे मारायला लावत असल्याचे त्यांनी सांगितले. मला न्याय मिळाला नाही, तर मी 15 ऑगस्ट रोजी आत्मदहन करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. बीडमधील 15 शहिदांच्या कुटुंबाला अद्याप जमिनीचा लाभच मिळालेला नाही. याप्रकरणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आठ दिवसात जमीन मिळेल, असे आश्वासन देऊन आठ महिने उलटले. मात्र, न्याय मिळत नसल्याचे शहीद जवान पत्नी भाग्यश्री राख म्हणाल्या