बीड- जिल्ह्यातील गेवराई येथील शासकीय उप जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना आरोग्य सेवा मिळत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. संबंधित काही डॉक्टरांच्या सतत गैरहजेरीमुळे खासगी रुग्णालयात रुग्ण जात असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे चित्र गेवराई उप जिल्हा रुग्णालयात पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे शल्य चिकीत्सक डॉ. अशोक थोरात यांनी सूचना देऊनही संबंधित यंत्रणा आरोग्य सेवेकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. यामुळे गेवराई येथील शासकीय उपजिल्हा रूग्णालय असून अडचण नसून खोळंबा असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
शल्य चिकित्सक यांच्या विशेष प्रयत्नांतून आलेली हाडांच्या शस्त्रक्रियेची मशीन, जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिलेली मशीन देखील धुळखात पडून आहे. गरोदर महिलांची मोठी हेळसांड होत आहे. त्यामुळे संबंधित रुग्णांना खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. यामुळे गरीब रुग्णाच्या खिशाला झळ बसत आहे. या रूग्णालयात सोनोग्राफीसाठी मोठी गर्दी असते. मात्र, रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन बंद आहे. त्यामुळे डॉक्टर रुग्णांच्या हाती चिठ्ठी देऊन त्यांना खासगी रुग्णालयात पाठवितात. परिणामी खासगी रुग्णालयात गोरगरीब रुग्णांना पैसे खर्च करावे लागत आहेत.