बीड- जगमित्र साखर कारखान्यासाठी जमिनी घेतल्याने धनंजय मुंडे यांच्याविरोधात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. मात्र या शेतकऱ्यांनी एक ते दीड तासातच हे आंदोलन गुंडाळल्याने चर्चेला पेव फुटले आहे. हे आंदोलन करण्यास शेतकऱ्यांना भाग तर पाडले नाही, ना अशीही चर्चा सध्या सुरू आहे.
..अन् शेतकऱ्यांनी धनंजय मुंडेंच्या विरोधातील आंदोलन तासाभरातच गुंडाळले
धनंजय मुंडे यांनी जगमित्र साखर कारखान्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या. मात्र ना कारखाना सुरू झाला, ना शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले. मात्र हे आंदोलन शेतकऱ्यांनी एवघ्या एका तासातच गुंडाळले. त्यामुळे चर्चेला पेव फुटले आहे.
मागील अनेक वर्षापासून धनंजय मुंडे यांनी फसवणूक केल्याबाबतचा विषय गाजत आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आम्हाला प्रलोभन दाखवून आमच्याकडून जमीन लिहून घेतल्या. त्या जमिनीचा सौदा ज्या भावात झाला होता, ते पैसे देखील आम्हाला आजपर्यंत मिळालेले नाहीत. मुलाला नोकरी देऊ असा शब्द तेव्हा जमीन घेताना दिला होता. मात्र तो शब्द देखील पाळला नाही. एकंदरीतच आमची फसवणूक झाली आहे. आमच्या जमिनी पुन्हा आम्हाला परत द्या, अशी मागणी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील शेतकरी उद्धव कचरू सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी केली आहे. निवेदनावर नऊ शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
आंदोलक शेतकऱ्यांनी योग्य मागणी केलेली असली, तरी अवघ्या काही तासातच हे आंदोलन त्या शेतकऱ्यांनी मागे घेतले. यावरून उलट सुलट चर्चा देखील झाली. हे आंदोलन शेतकऱ्यांनी केले, की या शेतकऱ्यांना आंदोलन करण्यास जाणीवपूर्वक भाग पाडले, याची मोठी चर्चा बीड जिल्ह्यात होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर माणिक भालेराव, दिगंबर पवार, उद्धव सावंत, संजय सावंत, शांताबाई सावंत, यमुनाबाई भालेराव, लखन भालेराव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.