बीड- शेतात दिवसभर पेरणीचे काम करुन सायंकाळी घराकडे निघालेल्या बापलेकाच्या अंगावर अचानक वीज पडली. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला असून वडील किरकोळ भाजले आहेत. जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील जातेगाव शिवारात सोमवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बीड: बापलेकाच्या अंगावर पडली वीज.. मुलाचा मृत्यू, वडील जखमी
दिवसभर शेतातील पेरणीचे काम केले व सायंकाळी काम आटोपून गावाकडे येत असताना, अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. यादरम्यान विजेचा कडकडाट झाला व क्षणार्धात दोघांच्या अंगावर वीज कोसळली.
रवी अर्जुन पवार (वय वर्ष 26) रा.जातेगाव असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, रवी हा आपले वडील अर्जुन पवार यांना शेतीच्या कामात मदत करण्यासाठी सोमवारी शेतात गेला होता. दिवसभर शेतातील पेरणीचे काम केले व सायंकाळी काम आटोपून गावाकडे येत असताना, अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. यादरम्यान विजेचा कडकडाट झाला व क्षणार्धात दोघांच्या अंगावर वीज कोसळली.
या घटनेत रवी गंभीर जखमी तर अर्जुन पवार हे किरकोळ जखमी झाले. दरम्यान रवीला जातेगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथील उपचाराला रवी प्रतिसाद देत नसल्याने तत्काळ बीड जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, प्रवासादरम्यान रवीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गेवराई तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची गेवराई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.