बीड - अल्पवयीन असतानाच पोटच्या पोरीला सोडून आई-वडिलांनी दुसरे लग्न केले. या आई-वडिलांनी बालवयातच तिचे एका व्यक्तीशी लग्न जमवले होते. त्याबदल्यात त्यांनी त्या व्यक्तीकडून पैसेही घेतले होते. मात्र, यानंतर त्या मुलीने लग्नाला विरोध केला आणि थेट पोलीस ठाणे गाठले. यांनतर पोलिसांच्या माध्यमातून बाल समितीच्या आदेशानुसार सुधार गृहात ती वास्तव्यास आली. यानंतर बीड येथील स्वाधार गृहात राहून त्या मुलीने जिद्दीने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. सुमन (नाव बदलले आहे) असे या लढवय्या तरूणीचे नाव आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने 'टीव्ही भारत' तिचा प्रवास जाणून घेतला.
बीड येथील स्वाधार गृहात साधारणतः 3 वर्षांपूर्वी अल्पवयीन असताना सुमन आली होती. आईने अल्पवयीन असताना लग्नाच्या बहाण्याने सुमनला एका व्यक्तीला विकलेच होते. मात्र, या सगळ्या परिस्थितीवर मोठ्या धाडसाने मात केली आणि घरातून पळ काढला. यानंतर थेट संबंधित पोलीस ठाणे गाठले. सुमन अल्पवयीन असल्यामुळे बाल समितीने सुमनला न्याय दिला आणि बीड येथील एका स्वाधार गृहात तिची रवानगी केली.