बीड- सर्वत्र वरुणराजाची कृपा होताच शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीला सुरुवात केली असल्याचे चित्र रविवारी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पाहायला मिळाले. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कापसाच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने दमदार एंट्री केली असल्याने बळीराजा सुखावला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण सरासरी 95.20 मिमी एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे.
बीड जिल्ह्यात कापसाचे पिक महत्त्वाचे मानले जाते. गतवर्षी जिल्ह्यात एकूण पावणेतीन लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. यंदा वेळेवर पावसाने सुरुवात केली असल्याने तीन लाख हेक्टरपर्यंत कापूस लागवड होऊ शकते असा अंदाज कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मागील दोन दिवसात बीड जिल्ह्यात एकूण सरासरी 95.20 मीमी पावसाची नोंद झाली आहे. बीड जिल्ह्यातील उक्कड पिंपरी येथील शेतकरी रामकिसन सांगळे यांनी दोन दिवसात 40 डब्बे कापूस लागवड केली आहे.