बीड- परळी पंचायत समितीच्या इमारतीचे उद्घाटन करणार्या पंचायत समिती सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचायत समिती परळीचे गटविकास अधिकारी लोखंडे यांच्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला सुरुवात होण्यापूर्वीच राजकीय द्वेषाचे चित्र बीड जिल्ह्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहे.
राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यामध्ये सध्या विविध कामांच्या भुमीपूजन व उद्घाटनावरुन स्पर्धा सुरु आहे. परळी तालुक्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था या धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आहेत. मात्र, केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने आलेल्या निधीतील कामांचे भुमीपूजन आणि लोकार्पण पालकमंत्री पंकजा मुंडे या करत आहेत.
परळी पंचायत समितीच्या नवीन इमारत ४ कोटी ८० लाख रुपये खर्चून बांधण्यात आले. या इमारतीचे लोकार्पण पंकजा मुंडे यांच्या हस्ते १२ जुलै रोजी करण्यात येणार असल्याचे जाहिर झाल्यानंतर या कार्यक्रमात राज्यशिष्टाचार पाळला नाही. तसेच आम्हा पंचायत समितीच्या पदाधिकार्यांना विश्वासात घेतले नाही, यावरुन परळी पंचायत समितीचे उपसभापती बालाजी मुंडे, नागापूरचे सरपंच मोहन सोळंके, पंचायत समिती सदस्य जानीमिया कुरेशी, वसंत तिडके व राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (११ जुलै) सायंकाळी या इमारतीचे उद्घाटन केले.
याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे यांच्या फिर्यादीवरुन वरील लोकांसह इतर अज्ञात २५ ते ३० लोकांविरुद्ध जमावबंदीचा भंग केल्याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, याचा पुढील तपास ए. पी. आय. धस या करित आहेत.