महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिल्लीच्या 'एनएसडी'च्या कलाकाराची करिअरसाठी धडपड; लॉकडाऊन नंतर पुन्हा मायानगरीच्या वाटेवर

लॉकडाऊन काळात अनेकांना बेरोजगारीचा सामना करावा लागला आहे. आता देश हळू हळू अनलॉक झाल्यानंतर रोजगार मिळवण्याची धडपड नव्याने सुरू होताना दिसत आहे. अशीच धडपड बीडमधील एका कलाकारालाही करावी लागणार आहे. एनएसडी मध्ये काम केलेल्या हा कलाकार लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झाला होता. आता लॉकडाऊन नंतर पुन्हा तो नवोदित कलावंत मायानगरी मुंबईची वाट धरतोय.

कलाकाराची करिअरसाठी धडपड
कलाकाराची करिअरसाठी धडपड

By

Published : Oct 31, 2020, 7:55 AM IST

Updated : Nov 2, 2020, 10:05 AM IST

बीड- नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) दिल्ली येथे काम केलेल्या आणि लॉकडाऊनमुळे गावाकडे यावे लागलेल्या नवोदित कलाकारांनाही कोरोनाच्या संकटाचा फटका बसला आहे. याचाच प्रत्यय बीडमधील एका बेरोजगार झालेल्या कलाकाराकडे पाहून आला आहे. मागील अनेक वर्ष दिल्ली येथे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये ॲक्टर म्हणून काम करत असलेले रवी धुताडमल यांना आता नव्याने टीव्ही-सिरीयल, नाटकांमध्ये काम मिळवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. या नवोदित कलावंताच्या संघर्षाचा 'ईटीव्ही भारत' ने घेतलेला हा आढावा.

दिल्लीच्या 'एनएसडी'च्या कलाकाराची करिअरसाठी धडपड
बीड येथील नवोदित कलाकार रवीकुमार बाबासाहेब धुताडमल याने अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत तीन वर्षांपूर्वी नाट्यशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर नाट्यशास्त्र विषयातच मुंबई येथे पदवीत्तर शिक्षण पूर्ण केले व दिल्ली येथे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे नॅशनल ॲक्टर म्हणून काम केले. बीड ते थेट दिल्ली हा रवीकुमार यांचा प्रवास वाटतो तेवढा सोपा नक्कीच नव्हता. रवी कुमार धुताडमल यांचे वडील बाबासाहेब धुताडमल हे रिक्षा चालवतात. तर किशोर धुताडमल आणि राजकुमार धुताडमल हे दोन भाऊ देखील कलाकारच आहेत. रवीकुमार धुताडमल यांच्या घरातच लहानपणापासूनच संगीत व वाद्यांची परंपरा आहे. त्यामुळे अभिनय गीत गायन या सगळ्या गोष्टी त्यांनी लहानपणापासूनच अनुभवले आहेत, पुढे याच गीत-गायन कला आणि अभिनयाला शास्त्रोक्त पद्धतीत बांधण्यासाठी रवीकुमार यांनी नाट्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पुढे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे तत्कालीन प्रमुख आणि बीडचे सुपुत्र वामन केंद्रे यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक नाटकांमध्ये रविकुमार धुताडमल यांनी अभिनय केला. आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या भाषांमधील नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केला असल्याचे ते अभिमानाने सांगतात. लॉकडाऊन नंतर सगळी घडीच विस्कटली- जानेवारी 2020 मध्ये ते दिल्ली येथून मुंबईमध्ये अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी आले होते. बऱ्यापैकी काम देखील सुरू झाले होते. मात्र मार्च 2020 मध्ये कोरोनाची बिकट परिस्थिती ओढावली आणि मुंबई मधील सर्व कामे थांबली. परिणामी रविकुमार यांना गावाकडे म्हणजे बीडची वाट धरावी लागली. अनेक वर्षाच्या संघर्षानंतर काही टीव्ही सिरीयलमध्ये रवीकुमार धुताडमल यांना काम मिळाले होते. मात्र लॉकडाऊनच्या बिकट परिस्थितीमुळे त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले गेले. सध्या रविकुमार हे बीड येथील घरी वास्तव्यास आहेत. मात्र आता सहा सात महिन्याच्या लॉकडाऊन नंतर त्यांनी पुन्हा मुंबईला जाण्याची तयारी सुरू केली आहे. येणाऱ्या या काळात विस्कटलेली घडी पुन्हा पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा रवी कुमार धुताडमल यांना आहे. मात्र, आता काम मिळवण्यासाठी त्यांना पुन्हा संघर्ष करावा लागणार आहे. हालाखीचे दिवस काढावे लागले-मागील सहा सात महिन्याच्या लॉकडाऊन काळामध्ये माझ्यासारख्या अनेक नवोदित कलाकारांना हालाखीचे दिवस काढावे लागले. आता पुन्हा मुंबईकडे जाताना मनात अनेक प्रश्न आहेत. लॉकडाऊन पूर्वी कास्टिंग करणारे जुने व परिचय असलेले लोक कोणीच त्या ठिकाणी भेटणार नाहीत. त्यामुळे आता नव्या माणसांशी भेटायचं आणि काम मिळवायचे हे अत्यंत अवघड आहे. मात्र कष्ट व संघर्ष करण्याची माझी तयारी आहे. त्यामुळे कामे मिळतीलच, पण ते केव्हा मिळणार? हे सांगता येणार नाही. तरीही काम तर मिळवावेच लागेल आणि ते मिळेल, असा विश्वास त्यांनी बोलून ईटीव्ही भारतकडे बोलून दाखवला.
Last Updated : Nov 2, 2020, 10:05 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details