महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औष्णिक विद्युत केंद्राच्या राखेमुळे प्रदूषणात भर; तीस टक्क्याहून अधिक नागरिक प्रदूषणामुळे त्रस्त

परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रातून मोठ-मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना विद्युत पुरवठा केला जातो. या औष्णिक विद्युत केंद्रातून मोठ्या प्रमाणात राख देखील बाहेर पडते. परळी आणि आसपासच्या गावांतील नागरिकांना या राखेमुळे त्रास सहन करावा लागत आहे.

By

Published : Feb 20, 2021, 9:17 AM IST

Pollution
प्रदूषण

बीड -परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या राखेचे प्रदूषण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ज्येष्ठ नागरिक तसेच फुफ्फुसाचा आजार असलेल्या नागरिकांना या राखेच्या प्रदूषणामुळे त्रास होत आहे. आतापर्यंत शेकडो नागरिकांना केवळ राखेच्या प्रदूषणामुळे आपले आरोग्य धोक्यात टाकावे लागलेले आहे. याबाबत घेतलेला हा आढावा....

परळी औष्णिक विद्युत केंद्रातील राखेमुळे बीडच्या प्रदूषणात भर
मागील अनेक वर्षापासून परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रात कोळशापासून वीजनिर्मिती केली जाते. महाराष्ट्रातील मोठ-मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना परळी येथून विद्युत पुरवठा केला जातो. मात्र, याचे दुष्परिणाम परळी येथील जनतेला भोगावे लागतात. कोळशापासून विद्युत निर्मिती करत असताना निर्माण होणारी राख मोठ्या प्रमाणात वातावरणात मिसळली जाते. परिणामी वातावरण प्रदूषित होते. वातावरणात दमटपणा निर्माण होतो. या सगळ्या परिस्थितीचे दूरगामी परिणाम परळीकरांच्या आरोग्यावर होत असल्याचे आरोग्य विभागातील तज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. पर्यावरण मंडळाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत परळी येथील औष्णिक केंद्रात विद्युत निर्मिती केली जाते. याबाबत दीड महिन्यापूर्वीच पर्यावरण मंडळाने औष्णिक विद्युत केंद्राला कारवाईचा इशारा दिला आहे.

दिवसाला 4 हजार ट्रक राखेची होते वाहतूक -

परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रातून 24 तासात 4 हजार ट्रक राखेची वाहतूक होते. विशेष म्हणजे राखेची वाहतूक करताना ट्रकमध्ये भरलेल्या राखेवर वाहन चालक साधी ताडपत्री देखील टाकत नाहीत. याचा परिणाम म्हणून परळी येथील वातावरणात मोठ्या प्रमाणात राख मिसळली जाते व प्रदूषण होते. हा प्रकार मागच्या दहा वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. अनेक वेळा आंदोलने करून देखील सत्ताधाऱ्यांना जाग येत नाही, असा आरोप नागरिक करत आहेत.

सत्ताधार्‍यांच्या इच्छाशक्तीचा अभाव -

परळी मतदार संघ हा राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. 2019 पूर्वी माजी मंत्री पंकजा मुंडे या सत्तेत होत्या व आता बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आहेत. मात्र, औष्णिक विद्युत केंद्राच्या राख प्रदूषण नियंत्रणाबाबत कुठलीच ठोस पावले अद्यापपर्यंत उचलली नाहीत. राखेच्या प्रदूषणामुळे केवळ परळी शहरच नाही तर आसपासच्या दहा-बारा गावांमध्ये देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे. परळीच्या प्रदूषण निर्मूलनाबाबत सत्ताधार्‍यांच्या इच्छाशक्तीचा अभाव परळीकरांना जाणवत आहे.

पर्यावरण नियंत्रणाचे नियम धाब्यावर -

परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. पर्यावरणाचे सगळे नियम धाब्यावर बसवून परळीच्या थर्मलमधून विद्युत निर्मिती केली जाते. परिणामी परळी शहर व ग्रामीण भागात प्रदूषणाचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत. आता याची दखल प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली आहे. औष्णिक विद्युत केंद्र बंद का करू नये, अशी विचारणा दीड महिन्यापूर्वीच औष्णिक विद्युत केंद्र प्रशासनाला प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details