बीड - १७ व्या लोकसभा निवडणुकीसाठी बीड जिल्ह्यात तयारी सुरू झाली आहे. या निवडणुकीत जिल्हाभरातून २० लाख २८ हजार ३३९ मतदार मतदान करणार आहेत. हे मतदान २ हजार ३११ मतदान केंद्रांवरून होणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी केले आहे.
देशभरात रविवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे. यावर्षी एम-३ व्हर्जन ईव्हीएम मशीनचा वापर करण्यात येणार आहे. तसेच, व्हीव्हीपॅट मशीन देखील वापरण्यात येणार आहेत. बीड लोकसभा मतदारसंघात निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. याबाबत सोमवारी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना माहिती दिली.
पांडे म्हणाले, की बीड जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघात प्रशासनाने योग्य ती निवडणुकीची तयारी केली आहे. निवडणुकांदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस बंदोबस्त असेल. याशिवाय जिल्हा प्रशासनाच्यावतीने निवडणुकांमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे यासाठी मतदार जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १ हजार ४०३ गावांमध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम दाखवून मतदानाचा टक्का वाढवण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
बीड लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्वसामान्य नागरिकांना काही तक्रार करायची असेल, तर निवडणूक आयोगाच्या अॅपवर तक्रार नोंदवावी. त्यावर काही वेळातच कारवाई करण्यात येईल. १९५० हा टोल फ्री क्रमांक मतदारांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर मतदार यादीतील आपल्या माहितीची खातरजमा करून घेता येईल. तसेच मतदार यादीबाबत काही तक्रार असेल तरी तीही देता येईल.