औरंगाबाद- सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात एका महिलेला जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 50 वर्षीय महिला 95 टक्के भाजली आहे. या महिलेला उपचारासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केली आहे. संतोष सखाराम मोहिते (वय 40 रा. अंधारी) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 2 फेब्रुवारीला रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही महिला घरी एकटी झोपलेली होती. त्यावेळी मोहिते याने तिच्या घराचा दरवाजा वाजवला आणि घरात घुसला. महिलेने तू असा रात्री माझ्या घरात येऊ नकोस, त्यामुळे माझी बदनामी होईल, असे सांगितले. त्यामुळे आरोपीने महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच घरात असलेल्या प्लास्टिक कॅनमधील रॉकेल तिच्या अंगावर टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आणि घराला बाहेरून कडी लावून निघून गेला.
हेही वाचा - हिंगणघाट पीडितेची प्रकृती स्थिर असली तरीही गंभीर - डॉक्टर केसवानी
महिलेने आरडा-ओरड केल्याने महिलेची मुलगी व जावई धावत आले. त्यांनी या महिलेला विझवण्याचा प्रयत्न केला. पण, महिला यामध्ये 95 टक्के भाजली होती. तिच्यावर प्रथम सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथम उपचार करून औरंगाबाद येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.