पैठण (औरंगाबाद) - पाचोड, पाणी पुरवठा विहिरीसह कृषी पंपास वीजपुरवठा करणारा ट्रान्सफार्मर (रोहित्र ) जळाल्याने महिनाभरापासून थेरगाव (ता. पैठण) येथे निर्जळी निर्माण होण्यासोबतच पिकांची होरपळ सुरु आहे. यात मोसंबी उत्पादक शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान होत असल्याचे चित्र आहे.
अचानक विजेचा दाब वाढल्याने ट्रान्सफार्मर जळाला
थेरगाव (ता. पैठण) हे 3 हजार लोकसंख्येचे गाव असून गत दहा-बारा वर्षापूर्वी येथे ग्रामस्थाची तहान भागविण्यासाठी स्वजलधारा योजनेतर्गत पाणीपुरवठा विहीर खोदून नळ योजना राबविण्यात आली. पाणीपुरवठा विहिरीसह कृषी पंपास वीजपुरवठा करण्यासाठी ६३ अश्वशक्तीचा ट्रान्सफार्मर (रोहित्र) बसविलेला असून तो अचानक विजेचा दाब वाढल्याने महिनाभरापूर्वी जळाला. शेतकऱ्यासह ग्रामपंचायत प्रशासनाने नवीन ट्रान्सफार्मर बदलून मिळणेसाठी महावितरणचे उंबरठे झिजवण्यास सुरवात केली. थकीत वीजबील भरल्यानंतर ट्रान्सफार्मर देण्याचा महावितरणने घाट घातला असून ग्रामपंचायतकडे लाखो रुपये थकीत असून मागच्या वेळी ग्रामपंचायतने चाळीस हजार रूपयाचे धनादेश महावितरणला दिले. परंतु ते न वटता परत आल्याने महावितरणालाच शॉक बसल्याने आता रोख बिलाचा भरणा करावा, असा महावितरणने हट्ट धरला आहे.
मोसंबीच्या पिकाची वीजेअभावी पाण्यासाठी होरपळ
यावर्षी पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने सर्वत्र जलसाठे अद्याप पावेतो तग धरून आहे. परंतु पिण्याच्या पाण्यासोबतच पिकांना ट्रान्सफार्मरअभावी वीज नसल्याने फळबागाची होरपळ होत आहे. तर ट्रान्सफार्मर अभावी गावाचा पाणीपुरवठा बंद होऊन गावात महिन्यापासून निर्जळी निर्माण झाली. विहीरीत पाणी असतानाही वीजेअभावी ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्यासाठी रानोमाळ भटकतीचे दुर्देवी संकट ओढवले. तर शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेल्या मोसंबीच्या पिकाची वीजेअभावी पाण्यासाठी होरपळ होत आहे. ग्रामस्थ जालना पाणीपुरवठयाच्या गळक्या पाईपलाईनवर पाण्यासाठी तहान भागवित असून नाहक त्यांना त्रास सोसावा लागत आहे. ट्रान्सफार्मर बदलून आणण्यासाठी औरंगाबाद येथे जुने ट्रान्सफार्मर नेण्यात आले. परंतु बिलाचा भरणा व महावितरण कर्मचाऱ्याचा संप यासाठी अडसर ठरुन हे ट्रान्सफार्मर उपलब्ध होत नाही, तोपर्यंत पर्यायी मार्ग शेतकरी शोधत आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांना सर्वत्र भटकंती करावी लागत असल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दोन-तीन दिवसांत नवीन ट्रान्सफार्मर उपलब्ध होईल
सरपंच मिनाबाई मधुकर रोडगे यांनी तातडीने ट्रान्सफार्मर उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. यासंबंधी सहाय्यक कार्यकारी अभियंता अमित त्रिवेदी म्हणाले, 'जळालेले ट्रान्सफार्मर बदलून मिळणे करीता मागणी नोंदवली आहे, दोन-तीन दिवसांत नवीन ट्रान्सफार्मर उपलब्ध होईल.'