औरंगाबाद - रोजगार हमी योजनामंत्री संदीपान भुमरे यांचा माफीनामा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला आहे. मंत्री भुमरे यांनी पैठण येथे जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करत विकासकामांचे उद्घाटन केले होते. या उद्घाटन समारंभाचे चित्रण पाहून न्यायालयाने या याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्याबाबत भुमरे यांनी न्यायालयात माफीनापा सादर केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळून लावला आहे.
कोविड संदर्भातील सुमोटो याचिकेची सुनावणी
कोविड संदर्भातील सुमोटो याचिकेची सध्या खंडपीठात सुनावणी सुरू आहे. गुरुवारीही यासंदर्भात सुनावणी सुरू राहिली. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमावबंदी आदेश लागू असताना, भुमरे यांनी पैठण तालुक्यातील (४ मे. देवगाव) रोजी येथे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विकासकामांचे उद्घाटन केले होते. याबाबतचे चित्रण खंडपीठाने गंभीर दखल घेतली. तसेच न्यायालयाने 'याबाबत आपण काय कारवाई केली' अशी विचारणाही सरकारी वकिलांना केली आहे.
भुमरे यांनी सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात बिनशर्त लेखी माफीनामा सादर केला. मात्र, खंडपीठाने तो स्वीकारला नाही. तसेच दत्तात्रय गोर्डे यांनी न्यायालयाकडे भुमरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची अर्जाद्वारे विनंती केली होती. मात्र, न्यायालयाने गोर्डे यांचा अर्ज फेटाळला. दरम्यान पोलिसांनी फौजदारी प्रक्रियेनुसार कारवाई करावी, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
हेही वाचा -गोव्यात मे महिन्यात ऑक्सिजन अभावी 454 जणांचा मृत्यू ; 24 तासांत 76 दगावले