औरंगाबाद (सिल्लोड) - औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय भिकनराव कदम बसने सिल्लोड येथून औरंगाबादला जात असताना त्यांचे अडीच लाख रुपये सहप्रवाशी महिलांनी चोरल्याचा प्रकार घडला. मात्र, एसटी वाहकाच्या सतर्कतेमुळे या महिला पोबारा करण्याच्या तयारीत असतानाच त्यांना अडवण्यात आले. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडील रक्कम जप्त केली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली.
औरंगाबाद (सिल्लोड) - बस वाहकाच्या सतर्कतेमुळे चोरीचा डाव फसला, अडीच लाख रकमेसह पाच महिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात ग्रामस्थांनी त्या महिलांना घेराव घालत चौकशी केली
दत्तात्रय भिकनराव कदम हे ज्या गाडीत चालले होते त्या गाडीत या पाच महिला प्रवास करत होत्या. दरम्यान, त्या गाडीतून उतरत असताना एसटी वाहकाने आप आपल्या बॅगा तपासून घेण्याचे अवाहन केले. त्यावेळी कदम यांना आपल्याकडील पाच लाख या रकमेतील अडीच लाख रुपये नसल्याचे लक्षात आले. दरम्यान, या महिलांवर संशय घेत येथील ग्रामस्थांनी त्या महिलांना घेराव घालत चौकशी केली. त्यावेळी ही रक्कम त्यांच्याकडे मिळाली.
महिलांना अजिंठा पोलिस ठाण्यात दाखल केले
या प्रकारानंतर अजिंठा पोलिस ठाण्याचे साह्ययक पोलीस निरीक्षक अजित विसपुते यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर साह्ययक पोलिस निरीक्षक अजित विसपुते, पोलिस हेडकॉन्सटेबल आबासाहेब आव्हाड, अरुण गाडेकर, बाबुराव साबळे, प्रवीण बोदवडे आदींनी त्या महिलांना अजिंठा पोलिस ठाण्यात दाखल केले. त्यावेळी त्यांच्याकडून ही अडीच लाख रुपये रक्कम जप्त केली. दरम्यान, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्या महिलांचे खरे नाव व पत्ता तसेच पूर्वीच्या घटनांचा तपास साह्ययक पोलिस निरीक्षक अजित विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंठा पोलीस करत आहेत.