महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऊसतोड कामगाराच्या डॉक्टर मुलाचा कोरोनामुळे मृत्यू

एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण झालेला डॉ. राहुल पवार यांनी बुधवारी कोरोनाशी लढताना एमजीएम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

औरंगाबाद डॉक्टराचे कोरोनाने निधन
ऊसतोड कामगाराच्या डॉक्टर मुलाचा कोरोनामुळे मृत्यू

By

Published : May 29, 2021, 3:48 PM IST

औरंगाबाद -ऊसतोड कामगार असलेल्या आई वडिलांनी कष्टाने मुलाला डॉक्टर केलं. मुलानेही कशाचीही तमा न बाळगता दिवसरात्र अभ्यास करत डॉक्टरी शिक्षण पूर्ण केलं. मात्र कोरोना महामारीचे गाठलं आणि दुर्दैवाने डॉक्टर मुलाचा मृत्यू झाला. क्षणात सर्व स्वप्न मोडली. आई वडिलांच्या नशिबी सोन्याचे येणार तोच काळाने दुःखाच्या खाईत लोटले. ही दुर्दैवी व्यथा आहे डॉ राहुल पवार यांची.

मित्रांनी उभी केली मदत
एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण झालेला डॉ. राहुल पवार यांनी बुधवारी कोरोनाशी लढताना एमजीएम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. शिक्षण पूर्ण केलेल्या डॉ. पवार यांची ढासळती प्रकृती, आणि घरातील हलकीची परिस्थिती पाहून त्यांचा लहान भाऊ सचिन पवार यांच्यापासून ते अन्य डॉक्टर मित्रांनी सर्वोत्तम उपचार मिळावेत, यासाठी मदतीची चळवळ उभी केली होती. मात्र डॉ. राहुल पावर याची झुंज अपयशी ठरली.

ऊसतोड कामगाराचा मुलगा झाला डॉक्टर
मूळचे परभणीच्या पाथरी तालुक्यातील आनंदनगर तांडा येथील रहिवासी असलेले डॉ. राहुल पवार यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण आश्रमशाळेत, तर अकरावी-बारावीपर्यंतचे शिक्षण लातूरमध्ये घेतले. इतर नातेवाइकांच्या मदतीने शिकवणीवर्ग लावले. बारावीला उत्तम गुण मिळाल्यानंतर लातूरमधील खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी (बॅचलर ऑफ मेडिसिन अ‍ॅण्ड बॅचलर ऑफ सर्जरी) प्रवेश मिळाला. एकही वर्ष वाया जाऊ न देता वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. आई-वडील-भाऊ हे ऊसतोडीला जाऊन आपल्या शिक्षणाचा भार उचलत असलेल्या डॉ. राहुल पवार यांनी स्वत: स्वयंपाक तयार करून आणि गतवर्षीच्या करोनाच्या पहिल्या लाटेत इतर डॉक्टरांकडे सेवा देऊन शैक्षणिक खर्च उचलला. डॉ. पवार यांना कायमच आई-वडील, भावाच्या कष्टाची जाणीव असल्यानेच ते अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे प्रात्यक्षिक परीक्षा चुकवली तर पुन्हा कधी होईल याचा कालावधी स्पष्ट होत नसल्याने गेल्या महिन्यात कोरोनाची सौम्य लक्षणे असतानाही डॉ. पवार यांनी आराम-आहाराऐवजी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले होते. कोरोनाचा विषाणू फुप्फुसाला निष्क्रिय करत गेला. वेगवेगळ्या पद्धतीने उपचार करूनही डॉ. राहुलने एमजीएम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

डॉक्टर विमा संरक्षण देण्याची मागणी
डॉ. राहुल पवार यांच्यासारख्या तरुण डॉक्टरचा मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दिल्ली सरकारकडून तरुण डॉक्टरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना एक कोटींची मदत देण्यात येते. त्याच धर्तीवर आणि डॉ. राहुल यांची ऊसतोड कुटुंबाची पार्श्वभूमी पाहता त्यांच्या कुटुंबीयांनाही मदतीचा हात द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून आंतरवासिता सेवा बजावणारे विद्यार्थी इतर उपचारांसोबतच कोरोनाच्या कक्षातही काम करत आहेत. कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका पाहता निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणेच आंतरवासिता डॉक्टरांना विमा संरक्षण द्यावे, अशी मागणीही आता वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details