औरंगाबाद - कोरोनासारख्या मोठ्या महामारीतही राज्य चांगले चालले आहे, त्यासाठी चांगले सल्ले द्यायला हवे. मात्र, राज्यपाल भाजपाच्या सांगण्यावरून टीका करत आहेत. राज्यपाल महामहिम आहेत. त्यांनी निष्पक्ष असायला हवे मात्र, ते राजकारण करत असल्याचा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला.
मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यातही तणावपूर्ण स्थिती आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहित त्यांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत त्यांच्या हिंदुत्वाला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्याशी संवाद साधला...
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी राज्यपालांवर टीका केली भाजपा मंदिरे खुली करण्याची मागणी करत आहे. मंदिरे उघडली गेली आणि कोरोनाचे रुग्ण वाढले तर त्याला जबाबदार कोण असेल? असा प्रश्न खैरे यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री दोन वाजेपर्यंत बसून काम करतात. त्यावेळी राज्यपालांनी चांगले काम करता, असे बोलले पाहिजे. भाजपा राजकीय हेतू मनात ठेवून मंदिरे खुली करण्याची मागणी करत आहे. त्यांना जनतेचे काहीही पडलेले नाही, असेही खैरे म्हणाले.
श्रावण महिन्यात मीच मंदिरे उघडण्याची विनंती केली होती. मात्र, मंदिरांमध्ये होणारी भक्तांची गर्दी पाहता कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, हे लक्षात आल्याने मंदिरे बंदच ठेवणे गरजेचे आहे, असे स्पष्टीकरणही खैरे यांनी दिले. भाजपा बार आणि मद्यविक्री केंद्रांचा आधार घेऊन राज्य सरकारवर टीका करत आहे. राज्यात दारूची दुकाने उघडा, अशी मागणी सर्वात आधी कोणी केली ते पहा. केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसारच राज्यात दारूची दुकाने उघडली आहेत. काही लोक मुद्दाम जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे खैरे यांनी सांगितले.