औरंगाबाद -गुन्हे जगतातल्या अनेक गोष्टी वाहिन्यांवर कथेच्या माध्यमातून दाखवल्या जातात. अशाच एका कथानकावरून कल्पना घेत एका युवकाने आपली प्रेयसी मृत भासवण्यासाठी चक्क एका वेश्येची हत्या करून तिचा चेहरा जाळल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये समोर आला. चिकलठाणा पोलिसांनी आरोपीसह त्याच्या प्रेयसीला चाळीसगाव येथून अटक केली आहे.
औरंगाबादच्या पिसादेवी शिवार येथे काही दिवसांपूर्वी एका महिलेचे अर्थवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह सोनाली शिंदे या महिलेचा असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. मृत शरीरावर असलेले कपडे आणि दागिने पाहून भावाने मृतदेह सोनालीचा असल्याचे सांगितले. त्यावरून सोनालीचा पती सदाशिव शिंदेला पोलिसांनी अटक केली होती. सदाशिव सध्या चिकलठाणा पोलिसांच्या ताब्यात आहे. आरोपीने 'क्राईम पेट्रोल' हा टीव्ही कार्यक्रम पाहून प्रेरणा घेत चक्क एका वेश्येची हत्या केली आहे. आपल्या प्रेयसीला पळवून नेण्यासाठी त्याने हा खून केला.
पोलीस उपनिरीक्षक महेश आंधळे गुन्ह्याविषयी माहिती सांगताना पिसादेवी शिवारात २५ मे रोजी अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी तपास केला असता सोनाली शिंदे नावाची महिला गायब असल्याची तक्रार प्राप्त असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी सोनाली शिंदेच्या भावाला बोलावले. भावाने मृतदेह बहिणीचाच असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर सोनालीच्या भावाच्या तक्रारीवरून सोनालीचा पती सदाशिव शिंदेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली.
सोनाली चक्क जिवंत...
या प्रकरणाचा अधिक तपास करत असताना सोनालीचे छबादास वैष्णव या व्यक्तिसोबत अनैतिक संबंध असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. पोलिसांनी छबादासची माहिती काढली असता तो एका महिलेसोबत बाहेरगावी गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चाळीसगाव गाठून छबीदासला ताब्यात घेतले. मात्र, धक्कायक बाब म्हणजे सोनाली शिंदे जिवंत असून ती त्याच्यासोबत राहत असल्याचे समोर आले.
विवाहित प्रेयसी सोबत पळून जाण्यासाठी वेश्येची हत्या
छबीदास आणि सोनालीची चौकशी केली असता धक्कादायक वास्तव समोर आले. छबीदास आणि सोनाली आधीपासून प्रेमात होते. मात्र, सोनालीच्या कुटुंबीयांनी सदाशिव सोबत लग्न लावून दिले. मात्र, त्यांचे भेटणं हे चालूच होते. छबीदास आणि सोनालीला एकत्र राहायचे होते. त्यातच त्यांनी क्राईम पेट्रोलचा एक भाग पाहिला आणि त्यांना मार्ग मिळाला. छबीदासने एक वेश्या शोधली आणि तिचा खून केला. इतकेच नाही तर ती सोनाली वाटावी म्हणून तिचा चेहरा जाळून टाकला. आणि मृतदेह पिसादेवी शिवारात फेकून सोनाली आणि छबीदास पसार झाले. विरांगणाची हत्या करताना छबीदासने सोनालीचे कपडे आणि दागिने त्यामृत शरीरावर परिधान केल्याने तो मृतदेह सोनालीचा असल्याचा भास सोनालीच्या भावाला झाल्याचे निष्पन्न झाले.
अनैतिक प्रेमसंबंधातून घडलेला हा धक्कादायक प्रकार होता. हत्या झालेली वेश्या कोण होती याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी योग्य दिशेने तपास केल्याने खऱ्या आरोपीला अटक झाली. अन्यथा सोनालीचा पती निर्दोष असताना त्याला शिक्षा झाली असती. अनेक वेळा समाजात जागरूकता निर्माण व्हावी म्हणून क्राईम पेट्रोल सारख्या मालिका दाखवल्या जातात. मात्र, त्याच बरोबर या मालिकांचा दुष्परिणाम देखील असल्याचे दिसून येत आहेत.