महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Murder Over Money Dispute: पैशाच्या कारणावरून भररस्त्यात गोळीबार करून साथीदाराचा खून; आरोपीस आठ तासात अटक

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील बाईजीपुरा भागात बुधवारी रात्रीच्या सुमारास पैशाच्या कारणावरून पिस्टलने गोळीबार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिली. यात एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला होता. गोळीबार करणाऱ्या या आरोपीस जीन्सी पोलिसांनी अवघ्या आठ तासात अटक केली.

Murder Over Money Dispute
पैशाच्या वादातून खून

By

Published : Aug 10, 2023, 9:13 PM IST

खुनाच्या घटनेविषयी माहिती देताना पोलीस अधिकारी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):शहरातील जटवाडा रोड वरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. फैयाज बशीर पठाण असे या आरोपीचे नाव असून त्याने गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. मात्र, त्याच्याकडे बंदूक नेमकी आली कुठून? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.


बुधवारी केला गोळीबार:मृत हमदने आरोपी फैयाजला साडेसात हजार रुपये दिले होते. त्याने आपले पैसे परत मिळावे म्हणून सतत तगादा लावला; मात्र फैयाज पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. काही वेळा वाद देखील झाले होते. त्यात मयत हमदने शिवीगाळ केली होती, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. फैयाजने एकदा गोळीने उडविण्याची धमकी दिली होती. बुधवारी रात्री वेळ पाहून फैयाजने वेळ साधली आणि भर रस्त्यात गोळीबार केला. त्यात पहिली गोळी चुकली, दुसरी गोळी रस्त्यावरून जाणाऱ्या एकाला लागली. त्यामुळे फैयाजने हमदच्या समोर जाऊन गोळी झाडली आणि तेथून पळ काढला. यात हदमचा मृत्यू झाला.

आठ तासात आरोपीस अटक:पोलिसांनी अवघ्या आठ तासांमध्ये फैयाज बशीर पठाण याला जटवाडा परिसरातून अटक केली. त्याला विचारपूस केली असता, आईवरून शिवीगाळ केल्याने गोळी झाडल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले; मात्र अद्याप काही प्रश्नांची उत्तर मिळालेली नसून आरोपीची चौकशी करून अधिक माहिती घेतली जाईल, असे सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांनी सांगितले.

बंदूक आली कुठून:शहरात मागील दहा दिवसांमध्ये गोळीबाराच्या दोन घटना समोर आल्या. 31 जुलै रोजी भर दिवसा मुलाने आपल्या बापाला मारण्यासाठी बंदूकधारी पाठवले होते. त्यावेळी अवघ्या काही पैशांमध्ये गावठी कट्टा आरोपींनी आणल्याचे निष्पन्न झाले होते. त्यात बुधवारी रात्रीच्या वेळी भरवस्तीत घडलेल्या घटनेत आरोपीने बंदुकीचा वापर केला. नेमक्या या बंदुकी शहरात आल्या कशा आणि आरोपींपर्यंत त्या पोहोचल्या कशा? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. शांत आणि मोठे गुन्हे कमी असलेल्या या शहरात अचानक बंदुकीच्या धाकावर वाढलेले गुन्हे चिंतेची गोष्ट ठरली आहे. यावर पोलीस कसे नियंत्रण मिळवणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

हेही वाचा:

  1. Thane Gangwar : गँगवॉर! स्वतःच्याच टोळीतील गुंडावर पिस्तूलमधून झाडली गोळी; दोन गुंडांना अटक
  2. Mumbai Crime : बाप-लेकाने मिळून महिलेवर झाडल्या धडाधड गोळ्या; दोघेही फरार
  3. Girlfriend shot Hotel: मैत्रिणीवर गोळी झाडून त्याने झाडली स्वतःवरही गोळी

ABOUT THE AUTHOR

...view details