औरंगाबाद - मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकार विरोधात रोष व्यक्त करण्यात आला. त्यात लोकप्रतिनिधींच्या घरासमोर सोमवारपासून ढोल बजाव आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दिली.
मराठा आरक्षण : राज्यातील लोकप्रतिनिंधींच्या घरासमोर होणार ढोल बजाव आंदोलन मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी याआधी 42 युवकांनी बलिदान दिले. यापुढे आता कोणीही आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करू नका. आरक्षणासाठी शांततेत आंदोलन करू, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आप्पासाहेब कुढेकर यांनी युवकांना केले.
मराठा आरक्षणाला नोकरी आणि शिक्षणात स्थगिती मिळाल्याने, मराठा क्रांती मोर्चाने रोष व्यक्त केला आहे. राज्य सरकारने योग्य भूमिका मांडली असती तर ही स्थगिती मिळाली नसती. मात्र, राज्य सरकार आरक्षणाविषयी गंभीर नसल्याचा पहिल्यापासून जाणवत होते. मात्र, न्यायालयीन प्रक्रिया चालू असल्याने न्यायालयावर आम्हाला पूर्ण विश्वास होता. राज्य सरकारने योग्य पद्धतीने जर न्याय देण्याचा प्रयत्न केला असता तर निश्चित हा न्याय मिळाला असता. मात्र, तसे झाले नाही, असा आरोप मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आला.
औरंगाबादमध्ये पुढील वाटचालीस एक बैठक घेण्यात आली. राज्य सरकारने एक दिवसीय अधिवेशन घेऊन मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सरकारने मागणीचा गांभीर्याने विचार नाही केला तर मंत्र्यांना रस्त्यावरती फिरू देणार नाही. तसेच विविध प्रकारचे आंदोलन यापुढे केले जाईल, असा इशारा देखील मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने देण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाचा कुठलाही कार्यकर्ता आता रस्त्यावर उतरणार नाही. मात्र, सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. सोमवारपासून आंदोलनाचा पहिला टप्पा सुरू होत आहे. राज्यातील सर्वच पक्षाच्या आमदाराने खासदारांच्या घरासमोर आता आम्ही ढोल बजाव आंदोलन करणार असल्याचा निर्णय बैठकीत निर्णय घेण्यात आला.