...म्हणून मराठा क्रांतीमोर्चा पुन्हा रस्त्यावर
मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या आंदोलनात 42 जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यांच्या वारसांना सरकारी नोकरी व आर्थिक मदत करण्याचे सरकारने आश्वासन दिले होते. मात्र, आजपर्यंत हे आश्वासन पूर्ण न झाल्याने औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चातर्फे पुन्हा आंदोलन करण्यात आले आहे.
औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चातर्फे पुन्हा आंदोलन पुकारण्यात आले आहे. औरंगाबादपासून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. आंदोलनात बलिदान देण्याऱ्या युवकांच्या कुटुंबियांना मदत देण्याचे आश्वासन सरकारने पाळले नसल्याने हे आंदोलन छेडल्याचे मराठक्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितले.
मराठा आरक्षणासाठी 42 आंदोलकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरी व आर्थिक स्वरूपात मदत दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. पण, आश्वासन देऊन ते पूर्ण केले नाही, यामुळे मराठा क्रांती मोर्च्यांच्या वतीने शनिवारी (8 ऑगस्ट) औरंगाबाद येथील क्रांती चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. मागण्या पूर्ण न झाल्यानेआणखी जीव जातील, असा इशाराही आंदोलकांकडून देण्यात आला आहे.
मराठा क्रांती मोर्चातर्फे 23 जुलै हा बलिदान दिवस म्हणून पाळाला जातो. काकासाहेब शिंदे या युवकाने मराठा आरक्षण आंदोलनात आपले बलिदान दिले होते. त्यानंतर एकामागे एक असे 42 युवकांनी आंदोलनात आत्मबलिदान केले. या बलिदानानंतर शासनाने त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तस न झाल्याने 23 जुलैला कायगाव टोका येथे आंदोलन करण्यात आले होते. मात्र, सरकारतर्फे 30 जुलैला मुंबईत बैठक घेऊन मागण्याबाबत चर्चा करू, असे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र, मुंबईत झालेल्या बैठकीत मागण्या मान्य झाल्या नसल्याने 8 ऑगस्टपासून आंदोलन सुरू करण्याचा इशारा मराठा क्रांतीमोर्चा तर्फे देण्यात आला होता. त्यानुसार सरकार विरोधात आत्महत्या केलेल्या युवकांच्या कुटुंबातील सदस्यांना घेऊन मराठा क्रांतीमोर्चाच्या समन्वयकांनी आंदोलन सुरू केले. सरकारने न्याय दिला नाही तर ओढवणाऱ्या परिस्थितीला सरकारच जबाबदार असेल, असा इशारा मराठक्रांती मोर्चातर्फे देण्यात आला आहे.