औरंगाबाद - पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील शेतकरी बाळासाहेब आवारे यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या दोन सावकारांविरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर फरार झालेल्या खासगी सावकारांना अटक करण्याची पोलिसांकडून जाणूनबुजून टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांनी केला आहे. संबंधित फरार सावकारांना तत्काळ अटक न झाल्यास ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मुलाबाळांसह उपोषण करणार असल्याचा इशारा कुटुंबाकडून निवेदनाद्वारे देण्यात आला.
हेही वाचा -सोयगाव तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर
अधिक माहिती अशी की, विहामांडवा येथे २३ डिसेंबर २०२० रोजी बाळासाहेब विठ्ठलराव आवारे या शेतकऱ्याने आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यावेळी पोलिसांना मृत शेतकऱ्याच्या खिशात आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यात गावातील खासगी सावकार सूभाष धनराज कासलीवाल व नाथा रामचंद्र नरवडे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे लिहिले होते. त्यामुळे, शेतकऱ्याचा मुलगा विशाल आवारे यांनी पाचोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी कलम ३०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. मात्र, गुन्हा दाखल होऊन पाच दिवस उलटले तरीही सदर सावकारांना अटक करण्यात पाचोड पोलिसांना यश आलेले नाही.
संबंधित आरोपींना जाणून बुजून पोलीस अटक करीत नसल्याचा आरोप शेतकरी कुटुंबाकडून होत असून त्यांनी पाचोड पोलिसांनी आरोपींना तत्काळ अटक करावी. असे न केल्यास औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मुलाबाळांसह उपोषण करण्याचा इशारा कुटुंबाने ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
हेही वाचा -कन्नड तालुक्यातील १३८ ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर