औरंगाबाद - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या टाळेबंदीमध्ये बंद असणारी हॉटेल्स आणि बार आजपासून (दि. 5 ऑक्टोबर) उघडण्यात आले. पहिल्या दिवशी ग्राहकांचा कमी प्रतिसाद पाहायला मिळाला. सकाळीच हॉटेल सुरू करण्यासाठी व्यावसायिकांनी आदल्या दिवशी तयारी केली असली तरी सकाळच्या पहिल्या सत्रात मात्र ग्राहकांनी थंड प्रतिसाद दिला. त्यामुळे कोरोनाची भीती ग्राहकांमध्ये कायम असल्याचे पाहायला मिळाले.
औरंगाबादमध्ये हॉटेल्स अन् बार सुरू, ग्राहकांचा अल्प प्रतिसाद औरंगाबाद जिल्ह्यात अडीच हजार ढाबे, 350 हॉटेल्स आणि बियर बार आजपासून अधिकृतरित्या सुरू होत आहेत. गेल्या सात महिन्यानंतर हॉटेल सुरू करत असताना हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या निवडक कर्मचाऱ्यांनाच कामावर बोलावले आहे. त्यात परराज्यातील कर्मचाऱ्यांना दिवाळीपर्यंत तरी कामावर येऊ नका, असा निरोप हॉटेल व्यावसायिकांनी दिला आहे. त्यामुळे हॉटेल जरी सुरू झाली असली तरी त्यावर आधारित असलेली अर्थव्यवस्था सुरळीत होण्यासाठी वेळ लागणार असल्याचे दिसून येत आहे.
सरकारने लादलेल्या नियमांचे पालन करत हॉटेल व्यवसायिकांनी दोन टेबलमध्ये सुरक्षित अंतर ठेवले आहे. येणाऱ्या ग्राहकांची ऑक्सिजन पात्रता आणि शरीराचे तापमान तपासणी करून प्रवेश दिला जात आहे. मात्र, सकाळच्या पहिल्या सत्रात ग्राहकांचा थंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे अद्याप हॉटेल व्यवसाय सुरळीत होईल का, असा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे.
मागील तीन महिन्यांपासून घरपोच खाद्यपदार्थ पुरवताना हॉटेल जरी सुरू असले तरी पुरेसा नफा मिळत नाव्हता. आता नियम अटी लावून व्यवसाय सुरू केला असला तरी डिसेंबरपर्यंत व्यवसाय सुरळीत होणार की नाही याबाबत औरंगाबादचे हॉटेल व्यावसायिकांनी शंका व्यक्त केली आहे. हॉटेल व्यावसायिक नियम अटींचे पालन करत असल्याने आनंद वाटत असल्याचे मत ग्राहकांनी व्यक्त केले.
हेही वाचा -धर्म आणि जात न बघता हाथरस पीडितेला न्याय द्या - खासदार इम्तियाज जलील