महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तिढा सुटला.. जालन्यातून अर्जुन खोतकरांची माघार, दानवेच लढणार लोकसभा

अर्जुन खोतकर हे जालना लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक होते. या मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे विद्यमान खासदार आहेत. हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे. मात्र, खोतकर आणि दानवे यांच्या सध्या विस्तवही जात नाही. त्यामुळे दानवेंना शह देण्याच्या इर्षेने खोतकर पेटून उठले होते.

By

Published : Mar 17, 2019, 5:09 PM IST

अर्जुन खोतकरांना पेढा भरताना खा. दानवे

औरंगाबाद- जालना लोकसभा मतदारसंघात शड्डू ठोकून उभे असलेले शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात समेट घडवून आणण्यात आला. आज मुख्यमंत्री आणि उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी खोतकरांची मनधरणी करण्यात यश आले असून त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्जुन खोतकरांना पेढा भरताना खा. दानवे

अर्जुन खोतकर हे जालना लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक होते. या मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे विद्यमान खासदार आहेत. हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे. मात्र, खोतकर आणि दानवे यांच्या सध्या विस्तवही जात नाही. त्यामुळे दानवेंना शह देण्याच्या इर्षेने खोतकर पेटून उठले होते. त्यासाठी त्यांनी जालन्याच्या जागेचा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे धरला होता. केंद्रात आणि राज्यात शिवसेनेची भाजपसोबत युती झाल्यानंतरही खोतकर मैत्रीपूर्ण लढतीसाठी आग्रही होते.

यावर आज मुख्यमंत्री आणि उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला. या बैठकीला रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर, पंकजा मुंडे, खासदार संजय राऊत उपस्थित होते. वरिष्ठ नेत्यांच्या समजुत घातल्यानंतर अर्जुन खोतकर यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवेंना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली. अनेक दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असेलेल्या खोतकर - दानवे वादावर आजच्या बैठकीनंतर अखेर पडदा पडला आहे.

यावेळी खासदार दानवे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. "गेली दोन वर्षे अर्जुन खोतकर आणि आम्ही एकमेकांच्या विरोधात बोललो. आमच्यात वैयक्तिक वाद नव्हता. मात्र, या काळात ज्यांनी याला खतपाणी घातले त्यांना धडा शिकवला पाहिजे. युती होताच मी शस्त्र खाली ठेवले होते. आज अर्जुनाने धनुष्य खाली ठेवले आहे. मागच्या काळात अर्जुन खोतकर यांनी धोका दिला नाही आणि मीही दिला नाही. अर्जुन खोतकर परीक्षेला बसले तर १०० मार्क्स पडतील. ज्या वेळी मी परीक्षा देईल त्यावेळी मलाही १०० मार्क पडतील, आणि भांडण झाले तर कोणत्या कोर्टात जायचे मला माहित आहे", असे ते यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details