औरंगाबाद - भाजप आमदार प्रशांत बंब यांचा अधिकाऱ्यासोबतच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सरकारने रोखलेल्या रस्त्यांच्या कामाचे पैसे अदा केल्याने बंब यांनी जाब विचारला होता. या बाबत व्हिडिओ व्हायरल झाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप बंब यांनी केला आहे. भाजप मंत्र्यांच्या खात्यात अपहार झाल्याची भाजप आमदारांनी तक्रार दिल्याने चर्चांना उधाण आले आहे.
भाजप आमदार प्रशांत बंब यांचा अधिकाऱ्यांसोबत वाद
रस्त्यांच्या कामामध्ये अपहार केलेल्या कंत्राटदारांची बिले अदा करू नका असे सरकारचे आदेश आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल ६० कोटी रुपयाचे वाटप केले असल्याचा घोटाळा समोर आल्याचा आरोप आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे.
रस्त्यांच्या कामामध्ये अपहार केलेल्या कंत्राटदारांची बिले अदा करू नका असे सरकारचे आदेश आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल ६० कोटी रुपयाचे वाटप केले असल्याचा घोटाळा समोर आल्याचा आरोप आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरचे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी हा घोटाळा उघड करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांसोबत आमदारांच्या वादावादीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. २००९ ते २०१४ या काळामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात १५९४ रस्त्यांची कामे झाल्याचे दाखवण्यात आले होते. त्यानंतर ही कामे सदोष असल्याची आणि काही ठिकाणी कामे झाली नसल्याची तक्रार आमदार प्रशांत बंब यांनी केली होती. या तक्रारीनंतर ६९ कामांच्या झालेल्या चौकशीत कामे सदोष असल्याचे सिद्ध झाले होते. शिवाय काही ठिकाणी कामे न करता पैसै उचलले होते. या कामात डांबर नक्की कुठून आणले याची माहिती नाही, चाचणी निष्कर्ष नाही, अशा अनेक त्रूटी अहवालातच स्पष्ट झाल्या. यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कंत्राटदारांना बिले अदा करू नयेत असे आदेश दिले होते. मात्र, अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा वापर करून ६० कोटी रुपये कंत्राटदारांना देऊन टाकले. यामध्ये अधिकाऱ्यांनी आणि कंत्राटदारांनी संगनमताने भ्रष्टाचार केल्याचा आरोप आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे. आता भाजपच्याच आमदारांनी हा घोटाळा उघड केल्याने बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील काय कारवाई करतात, हे पाहावे लागणार आहे.