औरंगाबाद- मराठवाड्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्याची नुकसान भरपाई देण्यात आली. 18 नोव्हेंबर रोजी शासनाने अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मराठवाड्याला 819 कोटींची मदत मिळाली होती, त्यापैकी 386 कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना देण्यात आली.
राज्यात ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस आलेला परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या जीवावर उठला होता. यात मराठवाडा विभागात 41 लाख 49 हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. झालेले नुकसान पाहता शासनाने तातडीने पंचनामे करून आपला अहवाल सादर केला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या मदतीचा मराठवाड्याच्या वाट्याला 819 कोटी रुपये मिळाले. मिळालेल्या मदतीचे वाटप सुरू करण्यात आले असून जवळपास साडेचार लाख शेतकऱ्यांना 386 कोटींच्या मदत निधीचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.