अमरावती -बुद्ध पौर्णिमेच्या रात्री लख प्रकाशात मेळघाटातील वन्यजीवांचा वावर आणि चंद्राच्या पांढऱ्या शुभ्र किरणात निसर्ग अनुभवण्यासाठी १८ मे ला देशभरातील वन्यजीवप्रेमींची मांदियाळी मेळघाटात हजर राहणार आहे. या निमित्ताने मेळघाट वन्यजीव विभाग सज्ज झाला असून जंगलातील पाणवठ्यांच्या काठी ४२५ मचाण उभारण्यात आले आहेत.
बुद्ध पौर्णिमेला मेळघाटात निसर्ग अनुभवण्यासाठी वन्यजीवप्रेमींची मांदियाळी.. देशभरातील वन्यजीवप्रेमींसाठी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री जंगलचा अनुभव घेणे ही पर्वणी असते. मेळघाटातील चिखलदरा, तारुबंदा, ढाकना, हरीसाल, कोहा, धुळघात रेल्वे, सेमाडोह, रायपूर, जारीदा, हतरु, चौराकुंड, जमली आणि अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात येणाऱ्या नरनाळा या ठिकाणी बुद्धपोर्णिमेच्या रात्री वन्यजीवप्रेमींची गर्दी उसळणार आहे. ही सर्व ठिकाण घनदाट जंगलात येत असून प्रत्येक ठिकाणच्या वन्यजीव विभागाने वन्यजीवप्रेमींसाठी मर्यादित जागा आणि शुल्क आकारले आहे.
मेळघाटात एकूण ४२५ वन्यजीवप्रेमींसाठी ही संधी उपल्बध करण्यात आली आहे. याबाबत वन्यजीव विभागाने ६ मे ला कार्यालयीन वेबसाईटवर ऑनलाइन बुकिंग दुपारी ३ वाजता सुरू केली होती. अवघ्या काही तासातच देशभरातील शेकडो वन्यजीवप्रेमींनी या वेबसाईटवर उड्या घेऊन आपल्या वनभेटीचे स्थळ निश्चित केले. अमरावती वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या ४२५ जागा काही तासातच आरक्षीत झाल्या.
बुद्ध पौर्णिमेला दुपारी ३ वाजता नोंदणी झालेल्या सर्व वन्यजीवप्रेमींना त्यांनी निश्चित केलेल्या गावी पोचावे लागणार आहे. या ठिकाणावरून वन्यजीव विभागाचे कर्मचारी रात्री ज्या ठिकाणी वन्यजीवप्रेमींची दाट जंगलात पांनवठ्यालागत मचाणावर राहण्याची व्यवस्था करतील. बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात पाणवठ्यांवर येणाऱ्या प्राण्यांचे दर्शन वन्यजीवप्रेमींना घडणार आहे. हा सर्व अनुभव वन्यजीव विभागाने दिलेल्या नोंदवहीत प्रत्येकाला लिहावा लागणार आहे.
१८ एप्रिलच्या वन अनुभवासाठी वन्यजीव विभाग सज्ज आहे. या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. वन्यजीव प्रेमींनी निसर्गाच्या सानिध्यात शांततेचा आणि रम्यतेचा अनुभव घ्यावा असे आवाहन उपवनसंरक्षक विशाल माळी यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना केले.