महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Truck Driver Murder : ट्रकमधील माल पळविण्यासाठी ट्रकचालकांनी साथीदाराचाच केला खून; कटाचा 'अशाप्रकारे' उलगडा

ट्रकमधील 25 टन चना माल विकून मिळालेले पैसा आपसात वाटून घेण्याचा कट दोन ट्रक चालकांनी आखला. यासाठी त्यांनी साथीदार ट्रकचालकाचा खून केला आणि मृतदेह नाल्यात फेकून दिला. शेरू उर्फ महबूब खान छोटे खान असे मृत ट्रकचालकाचे नाव आहे. त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून अमरावती पोलिसांनी या खूनाचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली.

Truck Driver Murder
हत्या

By

Published : Aug 21, 2023, 7:46 PM IST

ट्र्क चालकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांची प्रतिक्रिया

अमरावती :वरुड येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ येथून दोन ट्रकमध्ये 25 टन चना भरून तो नागपूरला नेण्यासाठी निघालेल्या दोन ट्रक चालकांनी एका ट्रकातील माल लंपास करून त्यातून येणाऱ्या पैशांची वाटणी करण्याचा कट रचला. कटाप्रमाणे सारे काही सुरळीत सुरू असताना अचानक एकाच्या मनात भलतेच काही आले आणि त्याने चक्क अर्ध्या रस्त्यात दुसऱ्या ट्रक चालकाचा खूनच करून टाकला. 7 ऑगस्टच्या रात्री हा संपूर्ण प्रकार घडला. हे प्रकरण आता 20 ऑगस्टच्या रात्री उघडकीस आले. अमरावतीचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी यासंदर्भात संपूर्ण माहिती दिली.

असे आहे संपूर्ण प्रकरण :वरुड येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ येथून सुमारे 250 चना नागपूरच्या कळमना येथील गायत्री ऍग्रो इंडस्ट्रीजच्या संचालकांनी खरेदी केला. हा संपूर्ण चना वरुड येथून नागपूरला आणण्यासाठी एकूण सात ट्रक वरुडला पाठवले. यापैकी दोन ट्रक हे असलम नामक व्यक्तीचे होते. असलमने वाशिम येथील रहिवासी असणारा ट्रक चालक मुक्तार बेग हमजा बेग याला नागपूर वरून वरुडला ट्रक घेऊन पाठवले. तसेच नागपूर येथील रहिवासी असणारा शेरू उर्फ महबूब खान छोटे खान या दुसऱ्या ट्रक चालकाला त्याच्या ट्रकमधील माल काटोलला उतरवल्यावर थेट वरुडला पाठवले. वरुड येथे मुक्तार आणि शेरूची भेट झाली. या भेटीदरम्यान दोघांनीही एका ट्रकमधील मालासह ट्रकची विल्हेवाट लावून जी काही रक्कम मिळेल ती अर्धी-अर्धी वाटून घ्यायचे ठरवले. प्रत्येक ट्रकमध्ये 25 टन चना भरण्यात आला.

चण्याची विल्हेवाट लावण्यासाठी आखला प्लॅन :ट्रकमधील चण्याची विल्हेवाट लावण्यासाठी मुक्तार बेग याने यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील रहिवासी लालू उर्फ अखिलेश निषाद या व्यक्तीला वरुडला बोलावून घेतले. लालू हा वरुडला आला असताना ट्रकमध्ये चना भरणे सुरू होते. यामुळे मुक्तारने लालूला तिसऱ्या एका व्यक्तीच्या ट्रकमध्ये आराम करण्यास सांगितले. ट्रकमध्ये चना भरल्यावर रात्री आठच्या सुमारास शेरू हा त्याचा ट्रक घेऊन निघाला. त्यानंतर काही वेळाने मुख्तार बेग हा देखील चना भरलेला ट्रक घेऊन नागपूरच्या दिशेने निघाला. त्याच्या ट्रकमागे येणाऱ्या ओळखीच्या व्यक्तीच्या ट्रकमध्ये लालू हा झोपून होता. दरम्यान मार्गात डोरली या गावाजवळ अरमान ढाबा येथे शेरू जेवणासाठी थांबला. त्याने तिथून मुख्तारशी संपर्क साधला असता मुख्तारने माझ्या गाडीमागे असणाऱ्या ट्रकमध्ये लालू असून तो ट्रक बंद पडल्याने मला परत अर्ध्यात जावे लागेल. त्यामुळे उशीर झाला असे सांगून शेरूला डोरली येथील अरमान धाब्यावरच थांबायला सांगितले.

मृतदेहाची लावली विल्हेवाट :रात्री मुख्तार बेग आणि लालू डोरली येथील अरमान धाब्यावर पोहोचले. त्यांनी तेथे जेवण केल्यावर ट्रकमध्ये झोपलेल्या शेरूला तू आणखी काही वेळ आराम कर असे सांगितले आणि मुख्तार बेग याने शेरूचा ट्रक लालूला चालवायला सांगितला. नागपूर जवळ येताच गोरेगाव टोल नाक्यालगत दोन्ही ट्रक थांबले. यावेळी मुक्तार आणि लालू या दोघांनीही आधीच ठरल्याप्रमाणे ट्रकमध्ये झोपून असलेल्या शेरूचा त्याच्याच ट्रकमध्ये खून केला. शेरूचा मृत्यू होताच त्याचा मृतदेह एका चादरमध्ये गुंडाळून लगतच एका पुलाखाली वाहणाऱ्या नाल्यामध्ये फेकून दिला. यानंतर मुख्तार बेगने शेरूचा मोबाईल फोन स्वतःच्या जवळ ठेवला आणि नागपूरमध्ये आल्यावर तो फेकून दिला. शेरूचा ट्रक घेऊन लालू मात्र पसार झाला.


शेरूच्या खुनाची कबुली :मुख्तार बेग हा चण्याचा ट्रक घेऊन पोहोचला; मात्र शेरू पोहोचला नसल्यामुळे ट्रक मालक असलम याने आठ ऑगस्टला वरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शेरू घरी परतला नसल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी देखील 11 ऑगस्टला नागपूर येथील कपिल नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरुड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने सर्वांत आधी मुख्तार बॅग याची चौकशी करून संशयाच्या आधारावर त्याला अटक केली. अटकेदरम्यान मुख्तार बेग याने आम्ही दोघांनी ट्रकसह ट्रकमध्ये असणाऱ्या चण्याची विल्हेवाट लावण्याचा कट रचल्याचे सांगितले. या प्रकरणातील दुसरा आरोपी लालू याच्या संदर्भात पोलिसांनी मुख्तार बेग याच्याकडून कसून चौकशी करून माहिती काढण्याचा प्रयत्न केला. 20 ऑगस्टला लालूला देखील अटक केली. चौकशी दरम्यान दोघांनी मिळून शेरूचा खून केल्याची कबुली दिली.


दयनीय अवस्थेत सापडला मृतदेह :ट्रकचालक असणाऱ्या शेरूचा मृतदेह हा राष्ट्रीय वनोद्यान परिसरात फेकला होता. परंतु, जनावरांनी त्याचा मृतदेह बराच लांब अंतरापर्यंत फरफटत नेला होता. पोलीस घटनास्थळी गेले असता त्यांना दूर अंतरावर शेरूचे मुंडके आणि धड वेगळे झालेले आढळून आले. प्राण्यांनी खाल्ल्यामुळे शेरूचे मुंडके धडापासून वेगळे झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.


ट्रकचा अद्याप पत्ता नाही :शेरू चालवत असणारा ट्रक शेरूच्या हत्येनंतर लालूने नेमका कुठे नेला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. लालूने शेरूची हत्या केल्याची कबुली दिली असली तरी ट्रक आणि ट्रकमध्ये असणारा चना नेमका कुठे आहे याची माहिती पोलिसांना दिली नाही.

कारवाईमध्ये यांचा सहभाग :पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय अधिकारी निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे, पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक धीरज राजूरकर, दीपक दळवी, नितीन चुलपार, पोलीस अंमलदार राजू मडावी, संतोष मुंदाने, सचिन मिश्रा, रवींद्र बावणे, बळवंत दाबणे, विनोद पवार, सचिन भगत, पंकज फाटे, भूषण पेठे राजू चव्हाण प्रफुल लेव्हरकर, आकाश शेंडे, किरण गावंडे यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा:

  1. Crime News : मित्राच्या अल्पवयीन मुलीवर अनेक महिने बलात्कार, सरकारी अधिकारी निलंबित
  2. Husband Killed Wife Daughter : पोलीस पत्नी अन् मुलीची हत्या करुन पतीची आत्महत्या
  3. Nagpur Crime News: राज्याच्या उपराजधानीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, 24 तासांत तिघांची हत्या

ABOUT THE AUTHOR

...view details