अमरावती -मेळघाटातील आदिवासी नागरिक अंधश्रद्धेपोटी लसीकरण करून घेत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लस घेतल्याने मृत्यू होतो, अशी खोटी अफवा मेळघाटातील 200 गावात पसरल्याने खळबळ उडाली आहे. खोट्या माहितीवर विश्वास ठेवून हे आदिवासी बांधव लस घेण्यास घाबरत आहेत. परिणामी, आदिवासींच्या लसीकरणाचा टक्का खूप कमी झाला आहे. एकीकडे शहरात लस घेण्यासाठी गर्दी उसळत असताना मेळघाटात मात्र वेगळे चित्र आहे.
विनवण्या केल्यानंतर केवळ 17 जणांनी घेतली लस -
चिखलदरा तालुक्यात आतापर्यंत केवळ 1200 जणांचे लसीकरण झाले आहे. यापैकी काही वैद्यकीय कर्मचारी आहेत. लसीबाबत अंधश्रद्धा पसरल्याने जिल्हा प्रशासनाची मोठ्या प्रमाणावर दमछाक होत आहे. सिमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात एप्रिल महिन्यात लसीचे 400 डोस आणण्यात आले होते. मात्र, वारंवार विनवण्या केल्यानंतर केवळ 17 जणांनी कोरोनाची लस घेतली. त्यामध्ये आरोग्य कर्मचारी आशा वर्कर त्यांचा सहभाग होता. उर्वरित 380 लसी परत गेल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.