अमरावती - धोबी ते आता तब्बल १२३ बेवारस, अनाथ, अपंग, अंध मुलांचा बाप, हा जेष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांचा जीवनप्रवास. नुकतेच त्यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची मानद डी. लिट ही पदवी मिळाली. त्यांच्या जीवन प्रवासावर 'ईटीव्ही भारतने' विशेष मुलाखतीच्या माध्यमातून प्रकाश टाकला.
हेही वाचा -..अन यशोमती ठाकूर यांनी लाटल्या पोळ्या; जेवणाचे पार्सलही भरले
जेष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर हे मूळचे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात राहणारे. त्यांचे पूर्वी कपडे धुण्याचे दुकान होते. तरुण वयापासूनच समाजासाठी भरीव काम करण्याची त्यांची इच्छा होती. म्हणून त्यांनी पत्रकारिता हे क्षेत्र निवडले. त्यांनी अनेक वृत्तपत्रात काम केले. त्यानंतर त्यांनी स्वतःचे देवकी नंदन गोपाला, हे मासिक सुरू केले. या माध्यमातून ते अनेक राजकीय, सामाजिक, अधिकारी अशा सर्व क्षेत्रातील लोकांसोबत जोडल्या गेले.
पत्रकार असल्याने त्यांची चहुबाजूंनी नजर असायची. रेल्वे स्टेशन, बस स्थानक आदी परिसरांत त्यांना अनेकदा बेवारस, मतिमंद, दिव्यांग, अनाथ मुले दिसून यायची. त्यामुळे, त्यांनी त्या मुलांचा सांभाळ करण्याचे ठरवले. अशाच चार बेवारस बालकांना घेऊन शंकर बाबा पापळकर यांनी अमरावती गाठली आणि १९९५ च्या दरम्यान हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे पदमश्री प्रभाकर वैद्य यांच्या माध्यमातून त्यांनी अचलपूर जवळच्या वझ्झर येथे स्वर्गीय अंबादास वैद्य अनाथ, दिव्यांग,अंध, बेवारस मुलांसाठी बालगृह सुरू केले. या बालगृहात जवळपास २०० मूलं होती. त्यातील अनेकांचे लग्न शंकरबाबा पापळकर यांनी लावून दिले, त्यामुळे आता सध्या या बालगृहात १२३ मुले-मुली वास्तव्यास आहे.