अमरावती - शहरातील विद्यापीठ परिसरातून जाणाऱ्या मार्डी-कुर्हा रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांनी अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येत असतात. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून या रोडवर अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रात्रीच्यावेळेस पथदिवेही बंद असतात. या कारणास्तव शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख अमोल निस्ताने यांच्या नेतृत्वात रास्तारोको करण्यात आला.
हेही वाचा-शेअर बाजाराचा सर्वोच्च विक्रमी उच्चांक; 269 अंशाने वधारून पोहोचला 40,435 वर
लेखी आश्वासना नंतर आंदोलन मागे
विद्यापीठ परिसरात असलेल्या मार्डी-कुऱ्हा या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. रस्ता रुंदीकरणाचे कामही संथगतीने सुरू आहे. या संबंधी विद्यापीठ शिवसेना शाखेच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकवेळा निवेदन देण्यात आले. रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात आली. मात्र, सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे परिसरातील संतप्त नागरिक व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या रोडवर रास्तारोको आंदोलन सुरू केले. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. एक तास चाललेल्या या आंदोलनानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देत हा रस्ता तत्काळ दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शिवसेनेतर्फे हे आंदोलन मागे घेण्यात आले.