अमरावती -लॉकडाऊन 5 ची घोषणा झाल्यावर अमरावती शहरात सोमवारी मोठ्या संख्येने अमरावतीकर घराबाहेर पडले. सकाळी आठ वाजल्यापासून शहरात सर्वत्र गर्दी पाहायला मिळाली. शहरातील राजकमल चौक ,जयस्तंभ चौक, इर्विन चौक हे मुख्य चौक वगळता इतर अनेक भागात छोटे मोठे दुकान उघडले होते. दरम्यान, राज्य शासनाने जाहीर केलेल्या 'मिशन बिगीन अगेन'अंतर्गत शहरात 3, 5 आणि 8 जून अशा तीन टप्प्यांमध्ये विविध सेवा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. तसे आदेश आज जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केले आहेत.
अमरावती तीन टप्प्यांमध्ये सुरू होणार सेवा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश येत्या 3 जूनपासून सर्व प्रकारच्या सार्वजनिक ठिकाणी व्यायाम, जॉगिंग, धावणे यासाठी सकाळी पाच ते सात या वेळेत मुभा असेल. सामूहिक हालचालींना प्रतिबंध किंवा जास्त अंतरापर्यंत जाता येणार नाही. सायकलींचा वापर अधिक करावा जेणेकरून अंतर राखले जाईल. प्लंबिंग दुरुस्ती आदी स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींनी अंतर व इतर दक्षता पाळून कामे करावी, वाहन दुरुस्तीसाठी गॅरेजमालकाने ग्राहकांना वेळा देऊन स्वतंत्रपणे बोलवावे व गर्दी टाळावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शासकीय कार्यालयात, आस्थापनात 15 टक्के कर्मचारी, तसेच ज्या ठिकाणी फक्त १५ कर्मचारी असेल त्या सर्व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे.
5 जून पासूनच्या दुसऱ्या टप्प्यात शहरातील मॉल, मार्केट, कॉम्प्लेक्स वगळून रस्त्याच्या एका बाजूची दुकाने समता तारखेला व दुसऱ्या बाजूची विषम तारखेला सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत चालू करता येणार आहेत. यासाठी परवानगी प्रक्रिया व इतर नियोजन महापालिकेला करावे लागणार आहे. कपडे खरेदी करताना ट्रायल रूम वापरण्याची परवानगी राहणार नाही. खरेदी केलेला माल बदलण्याची किंवा परत करण्याची परवानगीही राहणार नाही. सामाजिक अंतर दाखवण्यासाठी टोकन पद्धती व घरपोच वस्तू मागण्यावर भर द्यावा. ग्राहकांनी वाहनाऐवजी चालत जाणे किंवा सायकलचा वापर करावा. तसेच दूरचा प्रवास टाळावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
8 जून पासूनच्या तिसऱ्या टप्प्यात खासगी कार्यालयात दहा टक्के कर्मचारी बोलावता येईल. क्रीडा संकुल, क्रीडांगणे वैयक्तिक व्यायामासाठी खुली केली जातील. खेळांना मात्र मनाई आहे. आंतरजिल्हा बस वाहतूक करताना बसमधील एकूण प्रवासी क्षमतेच्या 50 टक्केच्या मर्यादित प्रवासी वाहतूक करता येईल. निर्जंतुकीकरण व सामाजिक अंतर आदी बाबी सर्वांनाच पाळाव्या लागतील. परवानगी प्राप्त दुकाने व आस्थापनाची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 असेल, असेही त्यांनी सांगितले.
ई-कॉमर्स क्षेत्रातील सेवांना परवानगी आहे. परवाना प्राप्त उपहारगृहामार्फत घरपोच सेवा देता येणार आहे. अमरावती शहरातील मुख्य भाजी बाजार मात्र या तिन्ही टप्प्यात उघडला जाणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.