अमरावती -पश्चिम विदर्भात मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. यंदा जून महिन्यात चांगला पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज होता. त्यामुळे 11 जूनपासूनच मान्सून जाहीर झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे पश्चिम विदर्भातील 75 टक्के शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या, पण आता पावसाने दडी मारल्याने पश्चिम विदर्भातील शेकडो हेक्टरवरील शेतावर दुबार पेरणीचे संकट आले आहे.
जुलैचा पहिला आठवडा सुरू आहे तरी 25 टक्के पेरण्या अद्यापही बाकी आहेत. मागील वर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम विदर्भात 90 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या, तर यंदा मात्र 75 टक्केच पेरण्या झाल्या आहेत. मागील वर्षी ज्या अकोला जिल्ह्यात 69 टक्के पेरण्या झाल्या होत्या त्या अकोल्या जिल्ह्यात यंदा मात्र 50 टक्केही पेरण्या झाल्या नाहीत.
- शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट -
हवामान खात्याने 11 जूनला मान्सून राज्यात दाखल झाल्याची घोषणा केली होती. तसेच जून महिन्यातसुद्धा यंदा चांगला पाऊस पडेल असा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला होता. हवामान खात्याच्या या अंदाजावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी जोमात पेरणी केली. परंतू, पेरणीनंतर मात्र पावसाने जोरदार दडी मारल्याने आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आले आहे. पश्चिम विदर्भातील जवळपास 70, 75 टक्क्यांपर्यत पेरण्या झाल्यानंतर पेरणीला ब्रेक लागला आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी केली आहे परंतु मागील पंधरा दिवसांपासून समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पेरलेले बी-बियाणंही अनेक ठिकाण उगवले नाही. तर जिथे पेरणी झाली त्यानंतर पाऊसच आला नसल्याने बियाणे उगवलेले नाही. त्यामुळे आता दुबार पेरणी कशी करावी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.