अमरावती- शासन प्रतिबंधित असलेल्या जीवघेण्या नायलॉन मांज्याची अद्यापही अमरावती जिल्ह्यात विक्री सुरू आहे. चांदुर बाजार शहरातील काही दुकानदारांची अवैध नायलॉन मांजाची चोरून विक्री सुरू असल्याची खात्रीलायक गुप्त माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवशी छापे टाकून प्रतिबंधित असलेला 28 हजार 350 रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करून चार व्यावसायिकांना अटक केली आहे.
शहरातील काही भागातील दुकानातून प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैधरीत्या सर्रास विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी एकाच दिवशी शहरात वेगवेगळया भागात छापासत्र सुरू केले. पहिला छापा गुलजार पेठ येथे मोहम्मद मुजमिल अब्दुल शरीफ याच्या राहत्या घरात छापा टाकून घराची झडती घेतली असता 17 हजार 790 रुपयांचा माल जप्त केला. दुसरा छापा आठवडी बाजारात बालक स्टोअर्स या दुकानात टाकून दुकानाची झडती घेतली असता शकील अहमद अब्दुल शफीज याच्याकडून 1 हजार 320 रुपयांचा माल जप्त केला. तिसरा छापा काझीपुरा येथे मोहम्मद सैफउद्दीन रतनवाला याच्या दुकानात छापा टाकून 8 हजार 970 रुपयांचा माल जप्त केला. चौथा छापा भटपुरा येथे फजल जनरल स्टोअर्समध्ये टाकला असता तेथून दुकानात 270 रुपयांचा नायलॉन मांजा सापडला. यावेळी ताहेर अली कमरुद्दीनसहित सर्व चारही आरोपी दुकानदाराला विविध गुन्हे दाखल करून अटक केली. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी अवैध व्यवसायावर लगाम लावण्यासाठी पोलिसांनी मोहीम उघडली असून चार आरोपींना अटक केली आहे.