अमरावती -कोरोनानंतर शाळा सुरू झाली, मग महाविद्यालय बंद का असा प्रश्न उपस्थित करत, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने मंगळवारी शहरातील विविध महाविद्यालयांसमोर आंदोलन करण्यात आले. महाविद्यालय सुरू करा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
शाळा सुरू कॉलेज बंद
कोरोनामुळे गेल्या वर्षी मार्च महिन्यात शाळा, महाविद्यालय बंद करण्यात आले होते. आज शाळा सुरू झाल्या आहेत. चिमुकली मुले शाळेत यायला लागली आहेत, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्यापही महाविद्यालये बंद आहेत. लवकरात लवकर महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला जावा या मागणीसाठी आज आंदोलन करत असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. दरम्यान यावेळी आंदोलकांनी अमरावती शहरातील शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय, सिपना अभियांत्रिकी महाविद्यालय, नरसम्मा महाविद्यालय, आरडी आयके महाविद्यालय, भारतीय महाविद्यालय, पुसदकर महाविद्यालय या महाविद्यालयांसमोर आंदोलन करून प्राचार्यांना निवेदन देण्यात आले.
महाविद्यालय सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन महाविद्यालय सुरू न झाल्यास विद्यापीठासमोर आंदोलन
आज आम्ही विविध महाविद्यालयांसमोर आंदोलन केले. आमच्या मागणीची दखल राज्य शासनाने घेतली नाही तर आम्ही सर्व एकत्रित येऊन विद्यपीठात तीव्र आंदोलन करू, असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महामंत्री रवी दांडगे यांनी दिला आहे.