अमरावती -कोरोनाने आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात काल सायंकाळी अमरावती जिल्हात झालेल्या गारपिटीसह वादळी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे आज दुपारी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपल्या अचलपूर मतदार संघातील एका नुकसान झालेल्या संत्राच्या शेतात जाऊन पाहणी केली व त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे सांगितले.
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली शेतीच्या नुकसान पाहणी
अमरावती जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. यामुळे हाती आलेले पीक वाया गेले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले आहे.
वादळी पावसाने जिल्हातील १० तालुक्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यात संत्राचा आंबिया बहार व लहान संत्र गळाली. तसेच काढणीला आलेला कांदाही भिजला. तसेच पपई, केळी या पीकाला देखील फटका बसला. कोरोनामुळे आधीच शेतमालाचे भाव पडले आहेत व लॉकडाऊनचा फटकाही शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपल्या मतदार संघात एका संत्राच्या शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांना तात्काळ मिळेल यासाठी प्रयत्न करू असे राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.