अमरावती- कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी अहोरात्र झटणाऱ्या कोरोना वॉरिअर्सना तणावाचे निरसन आणि सकारात्मक ऊर्जेच्या संचाराची अनुभूती मिळाली. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून कोरोना रुग्णालयात सेवा दिलेल्या व सध्या क्वारंटाइन असलेल्या डॉक्टर आणि पोलिसांसाठी ध्यान धारणा प्रशिक्षण डॉ. पंजाबराव देशमुख प्रशासकीय प्रबोधिनीत आयोजित करण्यात आले होते.
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी स्वतः या सर्वांसह ध्यानधारणेत भाग घेतला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम हेही यावेळी उपस्थित होते. प्रशिक्षक शिवाजी कुचे यांनी यावेळी सकारात्मक विचार, साक्षीभावाचे महत्त्व व ध्यानसंगीत प्रात्यक्षिकातून ध्यानधारणेची अनुभूती सर्वांना दिली. डॉक्टर व पोलीस यांच्यासह सर्वच या प्रात्यक्षिकात मनापासून सहभागी झाले होते.